सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : किरकोळ बाचाबाचीच्या कारणावरून ७ जुलै २०२३ रोजी काही युवकांच्या हल्ल्यात इंदापूर चे दोघे जखमी झाले. याची इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असताना एक महिना झाला, तरी इंदापूर पोलीस या प्रकरणातील हल्लेखोरांना पकडू शकले नाहीत. या हल्ल्यातील आरोपींना तातडीने पकडून कारवाई करावी या मागणीसाठी आज सोमवारी (दि.७) इंदापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा हल्ल्यात जखमी झालेल्या विवेक मखरे व केवल मखरे या बंधूंनी दिला आहे.
आज दुपारी १२ वाजता इंदापूर नगरपालिकेच्या मैदानातून मोर्चास सुरुवात केली जाणार असून हा मोर्चा इंदापूर तहसील कार्यालयावर जाणार आहे. इंदापूर शहराजवळ पुणे सोलापूर महामार्गावर हॉटेल पायल येथे झालेल्या किरकोळ बाचाबाचीचा राग मनात धरून मारहाण केल्याची फिर्याद विवेक मखरे यांनी पोलीस ठाण्यात दिली होती.त्यानुसार अकरा ते बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत आरोपींनी कोयता, रॉडचा वापर केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत विवेक विनय मखरे व केवल विनय मखरे (रा. सावतामाळीनगर, इंदापूर) यांनी तहसील कार्यालयात दिलेल्या निवेदनात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी इंदापूर तालुक्याच्या हद्दीमध्ये स्वतंत्रपणे फिरत आहेत. आरोपींकडून गुन्ह्यातील फिर्यादी व साक्षीदार यांच्या जीविताला धोका असल्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.