सातारा : महान्यूज लाईव्ह
सातारच्या वाढेफाटा येथील दृष्टी अकॅडमीत तिरंदाजीचं प्रशिक्षण घेतलेल्या ओजस प्रवीण देवतळे आणि सतरा वर्षीय आदिती गोपीचंद स्वामी या दोघांनी बर्लिन येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं. यानंतर साताऱ्यात एकच जल्लोष झाला.
बर्लिन येथील जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवणारे दोघेही सातारकर आहेत आणि दोघांनीही एकाच अकादमीत प्रशिक्षण घेतले आहे हे विशेष! हे प्रशिक्षण साताऱ्यातील एका पोलीस हवालदराने दिले आहे. प्रवीण सावंत हे त्यांचे नाव! या अकॅडमीसाठी सावंत यांनी घेतलेले कष्ट या सुवर्णपदकाने अधिकच लोकांच्या दृष्टीपथात आले आहेत.
बर्लिन येथील जागतिक तिरंदाजी स्पर्धेत कंपाउंड महिला सुवर्णसह भारताचे पहिले वैयक्तिक विजेतेपद पटकावणारी विश्वविजेती आदिती स्वामी जगातील सर्वात तरुण विश्व चॅम्पियन बनली आणि त्यानंतर काही वेळातच दीडशे पॉइंट चा अचूक स्कोअर घेत पुरुषांचे विजेतेपद जिंकून जगज्जेता ठरलेला ओजस देवतळे या दोघांनी संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. हे दोघेही एकाच अकॅडमीत आणि साताऱ्यात शिकणारे आहेत, म्हटल्यानंतर तर सावंत यांच्या अकॅडमीकडे सर्वांचे लक्ष गेले नसते तरच नवल!
आदिती ही अगोदरच हुशार होती, तसेच चिकाटी कायम होती, तर तेजस देवताळे हा तिरंदाजी मध्ये प्रभावी होता त्याला फक्त थोडेसे तांत्रिक कौशल्य दिले आणि त्यातून तो परफेक्ट झाला असे सावंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
यादरम्यानच त्यांनी या अकॅडमीची माहिती देताना जी गोष्ट सांगितली, ती मात्र खरोखरच अवाक करणारीच आहे. साताऱ्यातील मानवेंद्र कदम यांनी त्यांना एक एकर उसाच्या पिकाची जागा दिली आणि त्यानंतर आईचे दागिने गहाण ठेवून दोन लाखात त्याने दृष्टी अकॅडमी सुरू केली आणि तिथे सराव सुरू झाला. अजूनही ते दागिने बँकेतच आहेत, मात्र आता दोन जण जगजेते झाल्यामुळे या अकॅडमीला आता मान्यता मिळेल असा सावंतांना विश्वास आहे. 32 वर्षीय सावंत हे एनआयएस प्रमाणपत्र धारक आहेत.
आदिती ही सातारा तालुक्यातील शेरेवाडी गावची रहिवासी आहे. सध्या ती सातारा येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात शिकते, तिने जागतिक तिरंदाजी स्पर्धेत अंतिम लढतीत मेक्सिकोची एंड्रीया बेसेरा हिला हरवले. सलग तीन आशियाई चषक स्पर्धेत प्राप्त करणारी पदक मिळवणारी अदितीही महाराष्ट्रातील पहिली खेळाडू आहे, दोन महिन्यापूर्वीच तिने ज्युनिअर तिरंदाजी चषक जिंकला होता. तर तेजस देवतळे हा नागपूरचा रहिवासी असून त्याने अंतिम लढतील पोलंडच्या लुकाज थ्रीजीबिस्की याला हरवले. भारताने या स्पर्धेत तीन सुवर्णपदके व एक रौप्यपदक पटकावून भारताची कामगिरी चमकदार राहिली.