जीवन सोनवणे : महान्यूज लाईव्ह
धनगरवाडी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीमधील मोटेवस्ती येथे पुण्याहून महाबळेश्वरला दुचाकीवरुन निघालेल्या दुचाकीला कारने हुलकावणी दिल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटून दुचाकी घसरत पाठीमागील मालट्रकचे चाक डोक्यावरुन गेल्याने दुचाकीचालक फरदीन नसरुद्दीन शेख (वय 19, रा. कोंढवा, पुणे) या दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर झैद फारुख शेख (वय 18, रा. कोंढवा, पुणे) हा गंभीर जखमी झाला.
याबाबतची घटनास्थळावरुन व पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पुणे येथील वानवडी, कोंढवा परिसरातील आठ युवक चार दुचाकीवरुन महाबळेश्वरला पर्यटनासाठी निघाले होते. यावेळी धनगरवाडी (ता.खंडाळा) गावच्या हद्दीमध्ये मोटे वस्तीनजीक दुचाकी (क्र. एमएच-12- टिक्यू- 0566 ) वरील फरदीन शेख व पाठीमागे बसलेला झैद शेख हे आले. तेव्हा दुचाकीला एका कारने हुलकावणी दिल्याने दुचाकीचालक फरदीन शेख याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून दुचाकी घसरली.
यावेळी दुचाकी घसरताच पाठीमागे असलेला अज्ञात मालट्रकचे चाक फरदीन शेख याच्या डोक्यावरुन गेल्याने फरदीन शेखचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला सैद शेख हा गंभीर जखमी झाला. या अपघाताची माहिती मिळताच शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार शिवशंकर शेळके, संग्राम भोईटे यांनी शिरवळ रेस्क्यू टिमच्या सदस्यांच्या सहकार्याने झैद शेख याला शिरवळ येथील खाजगी रुग्णालयामध्ये व त्यानंतर अधिक उपचाराकरीता पुणे येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले.
या घटनेची शिरवळ पोलीस स्टेशनला अब्रार जमादार याने फिर्याद दिली असून घटनेचा अधिक तपास शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतिश आंदेलवार हे करीत आहेत.