राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दिल्ली : मी दौंडला रविवारच्या आठवडे बाजारात भाजीपाला विकण्यासाठी येत होतो. आजही तो प्रसंग मला चांगला आठवतोय, बालपणाच्या त्या आठवणी सांगताना माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार तो किस्सा सांगताना इतके मग्न झाले की, तो प्रसंग जसाचा तसा डोळ्यासमोर येतो. त्या आठवणी सांगताना पवार साहेब रमले आणि काही क्षण भावनिक ही झाले.
भारतीय राजकारणातील एक मुरब्बी राष्ट्रीय नेता, देशाच्या राजकारणातील एक चाणक्य, ८३ वर्षाचा एक योद्धा, अशी त्यांची भारतातच नव्हे तर जगभर ओळख आहे, ते बारामतीचे सुपुत्र केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार. ८३ वय झाले तरीही त्यांची किती स्मरणशक्ती तल्लख आहे, याचा प्रत्यक्ष अनुभव आम्हा पत्रकारांना पाहायला मिळाला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून फुटून झालेल्या बंडानंतर आणि अजित पवार सोबत गेलेल्या जवळच्याच आमदारांनी दिलेला धक्का यामुळे पवार साहेब हे सावरले नसतील अशीच भावना झाली होती. मात्र शरद पवार यांनी बालपणीच्या त्या आठवणी सांगितल्या आणि आम्हाला पण आश्चर्याचा धक्का ही बसला..!
बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंड तालुक्यातील पत्रकारांचा एक अभ्यास दौरा दिल्ली येथे आयोजित केला होता. यावेळी दौंड तालुक्यातील पत्रकारांनी दिल्ली येथील माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या ६ जनपथ येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी दौंड तालुक्यातील राजकीय शैक्षणिक सामाजिक अशा विविध प्रश्न संदर्भात मनसोक्तपणे चर्चा करीत गप्पा मारल्या.
त्यांनी त्यांच्या बालपणातील आठवणी आणि गमतीशीर किस्सा अगदी मनमोकळेपणाने सांगितला. ते म्हणाले की, मला दौंडचा रविवारी होणारा आठवडे बाजार आजही आठवतोय, मी मिळेल त्या गाडीने बारामती वरून दौंडला भाजीपाला घेऊन विकण्यासाठी यायचो, बाजारात दिवसभर भाजीपाला विकायचो आणि संध्याकाळी त्याच गाडीने पुन्हा बारामतीला जायचो, दळणवळण करण्यासाठी आम्हाला त्यावेळी एकच गाडी असायची.
एकदा काय झाले, मी आठवडे बाजारात भाजीपाला विकुन बारामतीला जाण्यासाठी गाडीत बसलो. आणि मध्येच झोपी गेलो. ती गाडी बारामतीला जाऊन पुन्हा दौंडला आली आणि दौंडमध्ये आल्यावर मला जाग आली, तेव्हा कळलं की, मी बारामतीवरून पुन्हा दौंडला त्याच गाडीने आलो आणि मी त्याच गाडीने परत बारामतीला घरी गेलो.
हा गमतीशीर किस्सा सांगताना पवार साहेबांनाही हसू आवरले नाही. दौंड शहरातील त्या वेळेच्या परिस्थितीचा ही त्यांनी अनुभव सांगितला. आता त्यावेळचे जुन्या पिढीतील लोकं राहिले नाहीत. असे अनेक अनुभव त्यांनी यावेळी सांगितले. दौंड आणि माझा हा अतूट संबंध आहे. तो आजही कायम आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले.
राजकीय जीवनात काम करताना दौंडकरांनी माझ्यावर मनापासून प्रेम केले आणि आजही पवार कुटुंबावर ते करीत आहेत. बारामतीसारखे शैक्षणिक विद्यालय बांधण्याचे माझे स्वप्न होते. मात्र मला अपेक्षित तेवढी जागा दौंडमध्ये उपलब्ध झाली नाही. आणि दौंड तालुक्यातील त्यावेळी राजकीय मंडळीनी पाहिजे तसे सहकार्य केले नाही. अशी खंत ही त्यांनी सध्याच्या दौंडच्या शैक्षणिक परिस्थितीबाबत पत्रकारांशी चर्चा करताना बोलुन दाखवली.
तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारी आणि पोलीसांकडून चुकीच्या पद्धतीने खोटे गुन्हे दाखल होत असल्याची माहिती मिळत असून त्यांनी याबाबत चिंता व्यक्त केली. दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशाह शेख यांच्यावर राजकारणातून खोटे गुन्हे दाखल झाल्याचेही समजले, हा शेखवर अन्याय झाल्याची त्यांनी खंत व्यक्त केली. दौंड पोलीसांच्या या चुकीच्या कामकाजावर शरद पवार यांनी तीव्र नाराजी दाखविली.
या प्रसंगी बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीनिवास पाटील, कात्रज दूध संघाचे माजी अध्यक्ष रामभाऊ टुले, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन काळभोर, अजित शितोळे, सचिन भिसे आणि दौंड तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.