रिएटर इंडिया कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन
जीवन सोनवणे : महान्यूज लाईव्ह
रिएटर इंडिया एम्पलॉइज फेडरेशनतर्फे कंपनी विरोधात २ ऑगस्टपासून विविध मागण्यांकरीता बेमुदत चक्री आंदोलन सुरू केले असून या या आंदोलनासंदर्भात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी कंपनी प्रशासनावर टीका केली आहे. आधी जमावबंदी आदेशामुळे या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन संप करावा लागत होता, आता शिरवळ पोलीसांनी केवळ पाच कर्मचाऱ्यांना कंपनीसमोर बसण्याची परवानगी दिली, त्यामुळे चक्री आंदोलनाची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे. मात्र आश्चर्यकारक बाब अशी आहे की, कंपनीने या कर्मचाऱ्यांना संपासाठी कंपनी गेटच्या बाहेरील बाजूस असलेल्या गटारावर जागा दिली आहे यावरूनच कामगारांना न्याय मिळवण्यासाठी आधी संप करावा लागतो, न्याय हक्कासाठी आंदोलन केले तर कश्या पद्धतीने मानसिक छळ केला जातो याचे हे उदाहरण असल्याचे मत जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी व्यक्त केले.
रिएटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी जागतिक स्तरावर नामांकित आहे. या कंपनीमुळे सातारा व पुणे जिल्ह्यातील जवळपास 2000 कामगारांना रोजगार देते त्यामुळे कामगारांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो अशा मोठ्या कंपन्या या जिल्ह्यामध्ये आल्या पाहिजेत आणि त्या दृष्टीने कामगारांनी देखील कंपन्या टिकण्यासाठी त्यांना सहकार्य केले पाहिजे. उद्योगाची वाढ झाली तरच येथील भूमिपुत्रांसाठी रोजगार निर्मिती होणार आहे हे देखील कामगारांनी विसरू नये. या विषयात उद्योगमंत्री, कामगारमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांच्याशी चर्चा केली आणि कंपनी प्रशासनाबरोबर देखील चर्चा करून हा विषय मार्गी लावणार असल्याचे पुरुषोत्तम जाधव यांनी स्पष्ट केले.
कंपनीमालक व कामगार यांच्यातील वादविवादाची हजारो प्रकरणे कामगार न्यायालयाकडे पडून आहेत. ही संख्या कमी होत नसून, त्यात सातत्याने वाढच होत आहे. या घटना का घडतात? यामागे कोणती प्रबळ कारणे असावीत? याचा शोध मात्र कोणत्याही घटकाकडून घेतला जात नाही वा त्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. आपल्या न्याय हक्कांसाठी दाद मागणे गरजेचे आहे; मात्र ते मागताना चुकीच्या मार्गाने मांडता कामा नये. यातून काम बंद होऊन आर्थिक गुजराण बंद होईल, असे होता कामा नये. आजचा कामगार हा पूर्णत: अज्ञानी नाही. आधुनिक यंत्रसामग्री हाताळण्याचे कौशल्य बाळगत असताना आपल्यावर होणा-या न्याय-अन्यायाची जाणीव तो ठेवून आहे. कामगारांच्या प्रश्नांविषयी समाजात खूप बोलले जात असले तरी, त्याचे समाजातील वास्तव चित्र अत्यंत विदारक असल्याचा अनुभव जाधव यांनी व्यक्त केला.
कंपनी मालक आणि कामगार यांनी कायद्याचे तंतोतंत पालन केल्यास समस्या उदभवणार नाहीत. त्यामुळे सगळ्यांनी आपापली जबाबदारी पार पाडल्यास संप, आंदोलन, उपोषणाचे मार्ग गाठण्यापर्यंतची वेळ येणार नाही. कंपनींनी कामगारांना सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्या, कामगारांनीही कठोर भूमिका न घेता दिलेली जबाबदारी परिपूर्णपणे पार पाडल्यास समस्या उदभवणार नाही. सगळ्या वादांवर कामगार आयुक्तांनी मध्यस्तांची भूमिका बजावल्यास आंदोलनाची वेळ येणार नाही. संघटनांनी आक्रमक होऊ नये आणि कंपनी मालकांनी कामगारांकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची खरी गरज आहे, असेही मत जाधव यांनी व्यक्त केले.
पुरूषोत्तम जाधव, जिल्हाप्रमुख शिवसेना:
कंपनीत कामगारांना न्यायिक सवलती दिल्या जात नाहीत. भीतीपोटी कामगार दबून राहतो. संघटनेच्या माध्यमातून याला वाचा फुटते; मात्र व्यवस्थापनही ऐकून घेत नाही. नियमाप्रमाणे सवलती व आर्थिक लाभ दिले गेले पाहिजेत; मात्र तसे होत नाही. परिणामी, बोट वाकडे केल्याशिवाय व्यवस्थापन ठिकाणावर येत नाही. नियमाच्या बाहेर गेल्यास कारवाई करा; मात्र नियम डावलून केल्यास संघटनांच्या आंदोलनाचे समर्थन करावेच लागते.