सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
राज्यात गेल्या तीन दिवसापासून चर्चा असलेल्या इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथील विहिरीच्या प्रकरणात विहीर मालक गिरीश विजय क्षीरसागर व बेलवाडी येथील हे काम घेणारा ठेकेदार विश्वास गायकवाड या दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गिरीश क्षीरसागर याला अटक करण्यात आली आहे.
इंदापूर तालुक्यातील अवाढव्य दगड खाणीची विहीर बनवताना या विहिरीला तीस फूट उंचीची रिंग बनवली जात होती आणि ही रिंग बनवताना तब्बल चार मजूर रिंग कोसळून मातीसह खाली पडले आणि मातीच्या ढिगार्याखाली गाडले गेले. तब्बल तीन दिवस त्यांचे शोध व बचाव कार्य सुरू होते. याची संपूर्ण राज्यात चर्चा सुरू होती.
राज्याचे लक्ष या घटनेकडे वेधले गेले होते आणि राज्याच्या विधिमंडळातही याची चर्चा झाली. राज्य सरकारने यातील मृताच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत केली होती. त्याचवेळी मृतदेह सापडल्यानंतर बेलवाडी गावातील ग्रामस्थ व नातेवाईकांनी याप्रकरणी न्याय मिळेपर्यंत रुग्णवाहिका हलू देणार नाही असा पवित्रा घेतला होता.
महसूल विभागाने व पोलिसांनी या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन मृताच्या कुटुंबीय व निकटवर्तीयांसह ग्रामस्थांना दिली होती. त्यानुसार काल सर्व सोपस्कार पार पाडताच पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आणि गिरीश विजय क्षीरसागर या 32 वर्षीय खाणमालकाच्या विरोधात व बेलवाडी येथील या कामाचा ठेका घेतलेल्या विश्वास गायकवाड या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.
याबाबतची फिर्याद भिगवणचे फौजदार विजय खाडे यांनी दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी याबाबत माहिती दिली. गिरीश क्षीरसागर याने त्याच्या म्हसोबावाडी येथील गट नंबर 338 मध्ये विहिरीच्या भोवती रिंग बांधण्याचे काम सुरू केले होते. हे काम धोकादायक असल्याची माहिती असूनही जाणीवपूर्वक ठेकेदार विश्वास गायकवाड व गिरीश क्षीरसागर या दोघांनी संगनमत करून या कामगारांना या ठिकाणी काम करण्यास भाग पाडले
या दगडखाण विहिरीचा व्यास 120 फूट गोल व तीस फूट उंचीची रिंग बांधताना त्या भोवती पन्नास फूट माती भरली होती. या कामात मजुरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो हे माहीत असतानाही या मजुरांना विहिरीच्या सिमेंट काँक्रीटची रिंग बांधण्यासाठी कामाला लावले. ही रिंग ढासळली त्याच्यासोबत माती देखील दाखल आणि या माती आणि रिंग बरोबर १ ऑगस्ट रोजी काम करणारे मजूर जावेद मुलाणी, सोमनाथ गायकवाड, परशुराम चव्हाण, लक्ष्मण सावंत हे चारजण १२७ फूट खोलवर पडून माती खाली गाडले गेले.
ही माती व माती खाली गाडले गेलेले चार मजूर बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला तब्बल 66 तास लागले. त्यानंतर पोलिसांनी या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास भिगवण पोलीस करत आहेत.