सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
एरवी त्या बारामती आणि इंदापूर तालुक्याच्या वेशीवरील वनविभागाच्या निर्मनुष्य आणि निर्जन ठिकाणच्या त्या भागाकडे कोणी फिरकलेही नसतं.. पण गेल्या तीन दिवसापासून या ठिकाणी हजारो लोकांचा राबता आहे. गर्दी आहे, ती गर्दी काही केल्या हटत नाही. रात्रंदिवस ही गर्दी कोणाला तरी शोधते आहे. चार दिवसापूर्वी इथेच एका महाकाय विहिरीची रिंग बनवताना चार मजूर मातीच्या ढिगार्याखाली कोसळले आणि त्यातच ते अडकून राहिले.आज चार दिवस गेले त्यांचा शोध सुरू आहे.
इंदापूर तालुक्यातील मसोबावाडी येथील या विहिरीने विधिमंडळाचे देखील लक्ष वेधून घेतले. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास या विहिरीची रिंग बनवताना चार मजूर या रिंगसह विहिरीत कोसळले. 100 फूट बाय शंभर फूट एवढी अजस्त्र विहीर या ठिकाणी येथील शेतकरी विजय अंबादास क्षीरसागर हा बनवत होता.
क्षीरसागर याने यापूर्वी या ठिकाणी खाण बनवली होती. या खाणीतून तो दगड काढत होता आणि हे दगड काढून झाल्यानंतर मोकळ्या जागी पाणी साठवण्यासाठी त्याने ही विहीर बनवायला घेतली होती आणि त्यासाठी इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथील ११ मजूर गेले काही महिने काम करत होते. मंगळवारी तेथील चार मजूर कामावर आले आणि त्यांनी काम करत असतानाच चार वाजता ही रिंग कोसळली आणि रिंग कोसळून हे मजूर त्या मातीमध्ये दबले गेले.
तब्बल 120 फूट खोलीखाली हे मजूर दबले गेले आहेत आणि त्यामुळे गेली तीन दिवस रात्रंदिवस या ठिकाणी प्रशासनाचे बचाव कार्य व शोध कार्य सुरू आहे. इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे विहिरी बनवण्याचे काम मजूर करत असतात. त्या ठिकाणी या मजुरांची संख्या जास्त आहे.
त्यापैकी 11 मजुरांनी या विहिरीची रिंग बनवण्याचे काम हाती घेतले होते. त्यातील जावेद मुलाणी, सोमनाथ गायकवाड, परशुराम चव्हाण व मनोहर सावंत हे चार मजूर या मातीखाली दबले आहेत आणि त्याला आता जवळपास चार दिवस होत आले आहेत.
गेली तब्बल साठ तास या ठिकाणी बचाव कार्य व शोध कार्य सुरू आहे अजूनही हाती काही लागले नाही मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये आज या मुजरा पर्यंत पोहोचता येणार आहे. आसपासच्या जिल्ह्यातील ही या ठिकाणी लोक येऊन या कामाची आणि बचाव कार्याची पाहणी करत आहेत.