बारामती : महान्यूज लाईव्ह
नागरीक जागरुक असतील तर काय होऊ शकते याचे उदाहरण देणारी एक चांगली गोष्ट घडली आहे. पोपट धवडे या सामाजिक कार्यकर्त्याच्या जागरुकतेने सरकारी कर्मचाऱ्यांची लपवाछपवी उघडकीस आली. प्रकरणाचा बाभोटा होतोय असे लक्षात आल्याने संबंधित कर्मचाऱ्यांनी माघार घेतली असे या प्रकारात दिसते आहे.
संजीवकुमार मारकड आणि तेजस जगताप ही या अनुक्रमे बारामती व इंदापूर पंचायत समितीत काम करत असलेल्या विस्तार अधिकाऱ्यांची नावे आहेत. या अधिकाऱ्यांचा प्रथम आपसी बदलीचा आदेश काढण्यात आला. यानूसार ३१ मे रोजी बारामतीचे अधिकारी इंदापूरला आणि इंदापूरचे अधिकारी बारामतीला हजर होणे गरजेचे होते. हे दोन्ही अधिकारी जर बदलीच्या ठिकाणी हजर झाले नाहीत तर त्यांचे पुढील महिन्याचे पगार काढू नयेत अशी सक्त ताकीद या आदेशातच दिली होती. परंतू आज जुलै संपत आला तरी दोन्ही अधिकारी बदलीच्या ठिकाणी हजर झालेले नव्हते, तरीदेखील त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती.
या अधिकाऱ्यांना प्रतीनियुक्तीवर आहे त्याच पदावर थांबवून घेण्याचा प्रस्ताव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांमार्फत विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला. त्या प्रस्तावाचा आधार घेऊन हे दोन्ही अधिकारी आपपल्या जागा सोडत नसल्याचे चित्र होते. पोपट धवडे यांनी हा विषय लावून धरला. विभागीय आयुक्तांकडे पत्र दिले. महान्यूज लाईव्हमध्ये बातम्या आली. त्यानंतर दोन्ही अधिकारी १ ऑगस्ट रोजी आपल्या बदलीच्या जागी हजर झाले आहेत.
परंतू या प्रकारातील काही प्रश्न अद्यापही अनुत्तरीत असल्याचे पोपट धवडे यांचे म्हणणे आहे. जर ३१ मेनंतर हे अधिकारी बदलीच्या जागी हजर झाले नाहीत तर त्यांचे पगार काढू नये असे बदली आदेशातच म्हणले आहे. असे असताना हे अधिकारी दोन महिने उशीरा बदलीच्या जागी हजर झाले. आता त्यांची सेवा खंडीत केली जाणार का आणि त्यांना जो दोन महिन्याचा पगार दिला गेला त्याबद्दल काय कारवाई करणार या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.
आपसी बदली झाल्यानंतर त्यांचा प्रतिनियुक्तीचा प्रस्ताव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांनी कोणत्या अधिकारात पाठवला. जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना डावलून हा प्रस्ताव परस्पर विभागीय आयुक्तांकडे पाठविण्याचा त्यांना अधिकार आहे का? नुसता प्रस्ताव पाठविला म्हणून या अधिकाऱ्यांना थांबवून घेतले गेले हे बारामती आणि इंदापूरच्या गट विकास अधिकाऱ्यांचे कृत्य कायद्याच्या कक्षेत बसते का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळाले नसल्याचे पोपट धवडे यांचे म्हणणे आहे.