सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
म्हसोबावाडीच्या वीरकरवस्ती शेजारचा हा माळ आज माणसांनी फुलून गेला. सोमवारी रात्री नऊ वाजल्यापासून सुरू असलेल्या बचाव कार्याची माहिती आज सकाळी लोकांना जसं जशी मिळेल, तशी तशी लोकांनी या ठिकाणी गर्दी केली. मिळेल ती वाहने घेऊन लोक म्हसोबावाडीतील त्या विहिरीच्या ठिकाणी येत होते, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कालच्या चार जणांच्या बरोबर जे इतर सात जण काम करायचे, ते काल केवळ पौर्णिमा होती, म्हणून गोंदवले येथील तीर्थक्षेत्राला गेले म्हणून आले नव्हते अशी माहिती देताना या चार जणांच्या सहकाऱ्यांच्या अंगावर काटा आला होता.
विहिरीला रिंग बांधण्याचे काम बेलवाडी परिसरातील 11 जण करत होते, अशी माहिती या 11 जणांपैकी एका जणाने आज येथील घटनास्थळी दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कामाची ठिकाणी ११ जण दररोज काम करत होते. काल पौर्णिमा असल्याने इतर सारे जण गोंदवले येथील गोंदवले महाराजांच्या दर्शनासाठी गेले होते आणि दुपारपर्यंत काम होते म्हणून चार जण या ठिकाणी आले होते.
रात्री संध्याकाळी उशिरापर्यंत हे चार जण पोचले नाहीत, म्हणून त्यांचे कुटुंबिय या ठिकाणी भेटायला आले आणि त्यांनी घटना पाहिल्यानंतर मग सगळीकडे धावाधाव झाली असे गायकवाड या मजुराने सांगितले. आम्ही एकाच ठिकाणी काम करतो तसेच सारे जण एकमेकांना मदत करत असतात. गेल्या एक महिन्यापासून हे काम सुरू असून फक्त दोन दिवसाचे काम बाकी उरले होते. तेवढ्यात होत्याचे नव्हते झाले असे या मजुराने सांगताना शेजारी उभे राहिलेल्या अंगावर काटा उभा राहिला.