बारामती : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथील वन विभागाच्या हद्दीशेजारी असलेल्या खाणीतील विहीर तयार करताना रिंग कोसळून त्याखाली चार कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान काल रात्रीपासून या ठिकाणी अनेक पोकलेन मशीनच्या माध्यमातून या कामगारांचा शोध घेतला जात आहे.
म्हसोबावाडी येथे एका विहिरीचे काम सुरू होते. ही विहीर मोठ्या आकाराची होती. या ठिकाणी विहिरीला रिंग बांधण्याचे काम सुरू असतानाच काल संध्याकाळी रिंग कोसळून व आसपासचा मलबाही कोसळून त्या ठिकाणी काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे
काल संध्याकाळी कामगार घरी आले नाहीत म्हणून कामगारांच्या कुटुंबीयांनी या ठिकाणी भेट दिली, तेव्हा त्यांना हा प्रकार समजल्याचेही सांगितले जात आहे दरम्यान अनेक मशीन या ठिकाणी कार्यरत असून या कामगारांचा शोध घेतला जात आहे.
काल रात्रीपासून या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी देखील थांबून आहेत अशी माहिती दिली जात असून खरोखरच कामगार अडकलेत का? याविषयी अद्याप दुजोरा दिला जात नाही, मात्र या ठिकाणी हा मलबा बाजूला करण्याचे काम सुरू असून कामगारांच्या कुटुंबीयांनी मात्र कामगार या ठिकाणी होते अशी माहिती दिली आहे.
ही घटना सोमवार दि.१ रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास म्हसोबाची वाडी येथे घडली. अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद भोईटे, बारामतीचे विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार व त्यांचे कर्मचारी वर्ग तसेच तहसीलदार तळ ठोकून आहेत. या अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी जेसीबी, पोकलेन तसेच बचाव पथक तयार करण्यात आले असून काम सुरू आहे.
सणसर येथील विजय अंबादास क्षीरसागर यांच्या म्हसोबावाडी(इंदापुर,पुणे) गावाच्या हद्दीत कवडे वस्ती लगत जमीन गट नंबर ३३८ मध्ये असलेल्या विहिरीच्या रिंग बांधकाम सुरु होते.यावेळी ही दुर्घटना घडली आहे.