किकवी गावानजिक घटना, वाहनाच्या लांबच लांब रांगा
जीवन सोनवणे : महान्यूज लाईव्ह
भोर : पुणे सातारा महामार्गावरील किकवी नाजिक सुमारे ७० वाहने पंक्चर झाल्याच्या घटना घडल्या आहेत. रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पुलाजवळ पडलेल्या खड्यात वाहने आदळून ही घटना घडली आहे. यामध्ये वाहन धारकांचे मोठे नुकसान होत असून भविष्यात भयानक असा अपघात होण्याची शक्यता आहे.
प्रवास सुखाचा व्हावा आणि वेळेत पोहच व्हावे यासाठी राष्ट्रीय महामार्ग झाला. पुणे- सातारा या राष्ट्रीय महामार्गावरून वाहन नेताना अक्षरशः गावचे पाणंद रस्ते बरे असेच चित्र आहे. महामार्गावर किकवी व धांगवडी गावानाजिक पडलेल्या खड्ड्यामुळे वाहनाचे टायर फुटल्याने पंक्चर व्यवसाय सध्या तेजीत आहे. तर महामार्गाकडेला असलेल्या पंक्चर व्यवसायिकांच्या टपरीबाहेर टायरची मोठी थप्पी मोठी लागलेली दिसते. जिल्ह्यात महामार्गावर पडलेल्या खड्डे भरून घेण्यासाठी व रस्ता चांगला करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते महामार्ग रस्ते प्राधिकरणाच्या विरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
धक्कादायक म्हणजे किकवी व धांगवडीनजिक गेली एक ते दोन दिवसात ६० ते ७० वाहनाचे टायर फुटल्याच्या घटना घडल्या आहेत. टायर फुटल्याने महामार्गालगत मोठ्या प्रमाणात वाहनाच्या रांगा देखील लागल्या होत्या. या सर्व गोष्टींकडे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष असून होणाऱ्या नुकसानाला जबाबदार कोण ? असा सवाल आता वाहनधारकांकडून होत आहे. या मुळे वाहन धारकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग हा वाहतूकींच्या दृष्टीने धोकादायक बनला आहे. वेळेत आणि सुरक्षित वाहतुक करता येत नाही. पावसामुळे महामार्गावरील मोठ्या प्रमाणात खड्डेच खड्डे झाल्याने अपघात व वाहनाचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढले आहे. महामार्गावर पडलेला प्रत्येक खड्डा वाहनाचे चाक वाकवून त्याचे नुकसान करत आहे. रात्रीच्या अंधारात खड्ड्यांचा अंदाज देखील येत नसल्याकारणाने कित्येक चारचाकी वाहनांचे मॅगव्हिल्स वाकल्याच्या व टायर फुटण्याच्या घटना घडल्या आहेत.
काहींना चाके देखील मिळाली नाहीत. तसेच टायर पँचर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने महामार्गालगत असलेल्या टायर पंक्चरच्या टपऱ्याबाहेर बाद टायरची थप्पी लागल्याचे आणि पँचर काढण्यासाठी रांगा दिसत आहेत. तसेच दुचाकी वाहनाचे शॉकऑब्जर्व्हर आणि सायलेन्सर खराब होत असून त्याची मागणी वाढली आहे. मोठ्या वाहनाचेही टायर आणि पाटे खराब होत आहेत. एकंदरच वाहनांच्या खराबीमध्ये वाढ झाली आहे. रस्ते प्राधिकरणाच्या विरोधात किकवी ग्रामस्थ व सामाजिक संघटना एकत्र होत असून ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना या सर्व गोष्टींबद्दल माहिती असून देखील याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष होत असून त्यांना संपर्क केला असता, फोन घेण्यास टाळाटाळ केली जात असून अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा वाहन धारकांना दंड भोगावा लागत आहे.