राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवण हद्दीत असणाऱ्या काही ठराविक हॉटेल आणि लॉजवर वेश्याव्यवसाय केला जात असल्याची चर्चा सुरू आहे. परिसरातील संबंधित हॉटेल व लॉजचालकांनी या धंद्यात अल्पवयीन मुलींचा वापर सुरू केला आहे. अशी चर्चा भिगवण परिसरात असून या प्रकाराकडे पोलिसांनी लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.
भिगवण – बारामती रस्त्यालगत भिगवणपासून काही अंतरावर मदनवाडी परिसरातही हॉटेल आणि लॉजवर मागील गेल्या काही दिवसांपासून बेकायदा वेश्याव्यवसाय सुरू असलेल्याची चर्चा आहे. स्थानिक हाॅटेल व लाॅज मालकांनी ही हॉटेल परप्रांतियांना चालवण्यासाठी भाडे तत्वावर दिली आहेत. त्यांच्याकडून उत्तम जेवण व उत्तम राहण्याची सोय या नावाखाली वेश्याव्यवसायही केला जात असल्याची चर्चा आहे.
रस्त्यालगत व लोकवस्तीत हे हॉटेल आणि लॉज असल्यामुळे या व्यवसायामुळे स्थानिक लोकांची बदनामी होत आहे. याबाबत स्थानिक महिला वर्गांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष घालून संबंधित हॉटेल व लॉजवर कायदेशीर कारवाई करून ते कायमस्वरूपी बंद करावेत अशी मागणी स्थानिक महिला वर्गाकडून होत आहे.