सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : कॅनडा येथे झालेल्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स या कुस्तीच्या प्रकारात पुण्याचे अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी हे विश्वविजेते ठरले. त्यांनी गतविजेत्या जेसी सावता याला हरवत विश्वविजेतेपद जिंकले. विजय चौधरी हे महाराष्ट्रातील ट्रिपल महाराष्ट्र केसरी आहेत.
२९ जुलै २०२३ रोजी कॅनडा येथे वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स झाली. यामध्ये कुस्ती या खेळामध्ये उत्तम कामगिरी करत विश्वविजेता होताना विजय चौधरी यांनी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स हे जागतिक स्तरावर पोलीस दलासाठी ऑलिम्पिक मानले जाते. उपांत्य लढतीत त्यांचा सामना गतविजेत्या जेसी साहोटाशी झाला. अटीतटीच्या सामन्यात चौधरी यांनी साहोताचा ११-०८ अशा फरकाने पराभव केला.
तर अंतिम सामन्यात, विजय चौधरी यांनी अमेरिकेच्या जे. हेलिंगर वर १० गुणांची मोठी आघाडी घेत अंतिम सामना ११-०१ ने जिंकत भारताला 125 kg मध्ये सुवर्ण पदक मिळवून दिले.
जळगावच्या चाळीसगाव जिल्ह्यातील सायगाव बगळी या गावचे असलेले चौधरी हे महाराष्ट्रातील पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिवाय तीन वेळा महाराष्ट्र केसरी चॅम्पियन, ईतर अनेक मानाच्या कुस्त्यांचे विजेतेपद आणि तसेच राष्ट्रीय सुवर्णपदकावर देखील विजय चौधरी यांनी आपले नाव कोरले आहे.
चौधरी यांना काही महिन्यांपासून त्यांचे प्रशिक्षक हिंदकेसरी रोहित पटेल यांनी बायो बबलमध्ये ठेवले होते आणि पुण्यातील कात्रज येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात अनेक महिने कॅनडाच्या टाइम झोननुसार प्रशिक्षण घेत होते.
विजयाबद्दल चौधरी म्हणाले, “काही महिन्यांपूर्वी मी महाराष्ट्र राज्य पोलीस दलासाठी सुवर्णपदक जिंकले होते. त्या दिवशीच मी ठरवले होते की, मला जागतिक पोलीस खेळामध्ये माझ्या देशासाठी सुवर्णपदक जिंकायचे आहे. आज माझ्या मेहनतीचे चीज झाले असून मी जागतिक स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकून भारतीय कुस्ती क्षेत्रासाठी भरीव कामगिरी केल्याचा मला आनंद आहे.