दौंड : महान्यूज लाईव्ह
एक कंत्राटी शिपाई काय करतो? तुम्ही समजताल की बँक खूप सुरक्षित असते! असं काही नाही! पुण्यातून फोफावलेली आणि देशभर पसरलेली एक महान बँकेच्या दौंड तालुक्यातील गोपाळवाडी च्या शाखेतील एका कंत्राटी शिपायाने मुळापासून हदरवली. अधिकाऱ्यांचे आयडी पासवर्ड मिळवत या कंत्राटी शिपायानं तब्बल दीड कोटी रुपयांना गंडा घातला आहे. गेल्या काही दिवसापासून बँकेमध्ये याची चौकशी सुरू असून आळीमिळी गुपचिळी असा सगळा प्रकार सुरू आहे. त्यामुळे हा सगळा प्रकार अधिकाऱ्यांच्या संगनमताने झाला आहे का याची चौकशी होण्याची गरज आहे.
दौंड तालुक्यातील गोपाळवाडी बँकेच्या शाखेत मोठ्या प्रमाणावर लूट झाली असून या बँकेनेच खातेदारांना आवाहन करत कोणाच्या किती रकमा गेल्या आहेत याची चौकशी करायला सुरुवात केली आहे. एवढी मोठी राष्ट्रीयीकृत बँक हतबल झाल्याचे पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. अर्थात या दरम्यान या बँकेच्या संबंधित शाखेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना येथून हलवण्यात आल्याचेही समजते .
कंत्राटी पद्धतीने या बँकेत भरलेला शिपाई गोरगरीब खातेदारांच्या पैशावर डल्ला मारत होता आणि तेही गेल्या सहा वर्षांपासून! हे ऐकल्यानंतर अनेकांनी कपाळाला हात मारून घेतला आहे. अनेक खातेदारांकडून घेतलेले पैसे या पट्ट्याने बँकेत भरलेच नव्हते, तर ज्या बँक ग्राहकांच्या खात्यावर बऱ्याच वर्षांपासून महिन्यापासून पैसे आहेत आणि ते काढले गेलेले नाहीत, तसेच हा खातेदारही बँकेत बरेच दिवस आला नाही, अशा खातेदारांना हेरून मुदत ठेवीवर व्याज देण्याच्या बहाण्याने त्यांचे पैसे बँकेतून परस्पर काढले.
हा भामटा दर महिन्याला संबंधित खातेदारांच्या खात्यावर व्याज भरत गेल्याने कोणाला सुरुवातीला संशय आला नव्हता. परंतु ही लूट झाल्याचे आता निदर्शनास आले असून, प्राथमिक माहितीनुसार आत्तापर्यंत गोळा झालेल्या आकडेवारीनुसार दीड कोटीची लूट या भामट्याने केल्याचे समोर आले आहे. अजून यासंदर्भात बँक पोलीस ठाण्याच्या दारात गेलेली नाही. त्यामुळे यामध्ये अधिकाऱ्यांचे देखील संगनमत आहे का? हे पाहणे देखील गरजेचे बनले आहे.