इंदापूर : महान्यूज लाईव्ह
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना अपात्र ठरविण्याचा सातत्याने प्रयत्न केला गेला. थोडीथोडकी नव्हे गेली तीन ते साडेतीन वर्षे हे प्रयत्न जाणीवपूर्वक केले गेले. थेट कारखान्याच्या मालकालाच बाजूला सारण्याचा प्रयत्न न्यायदेवतेने विफल केला आणि सभासदांना न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, उपाध्यक्ष अमोल पाटील व संचालकांनी व्यक्त केली.
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. उच्च न्यायालयाने यासंदर्भात आदेश दिला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर मतदार याद्या बनवून त्यावरील आक्षेप मागविण्यात आले होते. निवडणूक अधिकारी व प्रादेशिक सहसंचालक निलीमा गायकवाड यांच्यासमोर या आक्षेपांवरील सुनावण्या झाल्या. त्यांनी आक्षेपकर्त्यांचे अर्ज अंशतः स्विकारून सभासदांना अपात्र ठरविण्याचा मुद्दा निकाली काढला. या निकालानंतर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या वतीने अध्यक्ष काटे, उपाध्यक्ष पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, कारखान्याचे बहुतांश सभासद मतदानासाठी अपात्र ठरविण्याचा विरोधकांचा डाव होता. राजकारण अशा पध्दतीने करून चालत नाही. आपण एकीकडे ज्यांना कारखान्याचा मालक म्हणतो, त्याच मालकाला मूळ प्रक्रियेतून बाजूला हटवण्याचा त्यांचा हेतू काही समजला नाही, मात्र तो चुकीचा होता, त्यामुळेच त्यांचा हा प्रयत्न उच्च न्यायालयापासून ते निवडणूक अधिकाऱ्यापर्यंत सगळीकडे विफल झाला. त्यामुळे विरोधकांनी आक्षेप घेतलेल्या त्या १५ हजार सभासदांना न्याय मिळाला व मतदानाचा पवित्र अधिकार मिळाला.
विरोधकांनी कितीही आक्षेप घेतले, आरोप केले, अफवा पसरवल्या, तरीही त्याकडे नेहमीच दुर्लक्ष करीत आम्ही मात्र कारखान्याची आर्थिक प्रगती साध्य करण्यासाठी व कारखान्याला आर्थिक कोंडीतून बाहेर आणण्यासाठीच प्रामाणिक प्रयत्न केले आहेत हे सर्व सभासदांना माहिती आहे. त्यांच्या टिकेकडे लक्ष न देता हा कारखाना आर्थिक कोंडीतून बाहेर आणून त्याचा नावलौकिक पूर्ववत प्राप्त करून देण्यासाठी आम्ही संचालक झटत असताना ते केवळ कारखान्याची बदनामी करून कारखान्याविरोधात अफवा पसरविण्याचे पध्दतशीर प्रयत्न करीत होते हेही लोकांना माहिती आहे.
अर्थात असे प्रयत्न सभासदही यशस्वी होऊ देणार नाहीत याचा आम्हाला विश्वास आहे. वास्तविक पाहता ही विचारांची लढाई आहे. ज्या सभासदांना अपात्र करण्याचा आटोकाट प्रयत्न विरोधकांनी केला, त्यातील सारेच एकाच विचारांचे असतील असे नाही, मात्र काहीही झाले, तरी सर्वांचेच अधिकार अबाधित राहीले पाहिजेत यासाठी आम्हीही निकराने लढलो.
छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व सभासदांना आम्ही दिलासा देऊ इच्छितो की, जवळपास प्रत्येक गावातील अनेक सभासदांना आम्ही त्यांचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी लढत आहोत. कदाचित यापुढेही लढावे लागेल, मात्र त्यामध्ये आम्ही अजिबात कमी पडणार नाही.