दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई तालुक्याच्या ओझर्डे, पसरणी कुसगाव सिद्धनाथवाडी या भागामध्ये चोरट्यांनी एकाच दिवसात सहा ते सात ठिकाणी चोऱ्या करून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रकमा चोरून नेल्या. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
ओझर्डे या गावात अज्ञात चोरट्यांच्या टोळीने कुलुप, कड्या तोडुन ३ घरांमधून लाखो रुपयांचे सोने व रोख रक्कम लंपास केली, तर इतर ३ घरांमध्ये प्रवेश केला पण चोरट्यांच्या हाती त्या ठिकाणी काहीच लागले नाही. दरम्यान वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील पसरणी, कुसगाव, सिध्दनाथवाडी या गावांमधील घरे फोडून तेथेही लाखो रुपयांचे सोने व रोख रक्कम चोरून नेली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भुईंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ओझर्डे गावात मालदरा भागातील रस्त्यावरुन दोन मोटरसायकलवरुन सहा जणांनी माळआळीत पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास प्रवेश केला. सुरवातीला नंदकुमार पिसाळ याचे बंद घर फोडून आत प्रवेश करुन घरातील व कपाटातील साहित्य बाहेर काढून टाकले, पण ते मुंबईला असल्याने त्यांच्या घरातुन काय गेले हे समजु शकले नाही. पुढे चोरट्यांनी आपला मोर्चा वैभव पिसाळ यांच्या घराकडे वळवला. त्यांच्याही घराचे कुलूप आणी कोयंडा तोडुन आत प्रवेश करुन कपाटातील प्रत्येकी दोन तोळे सोन्याच्या चार अंगठ्या व २० हजार रुपये रोख रक्कम घेवून चोरट्यांनी पोबारा केला.
त्यानंतर विष्णू सोनावणे यांच्याही घराचे कुलूप तोडून आत घुसले आणि कपाटातील साडेसहा तोळे सोन्याचे दागिने व रोख अडीच हजार रुपये चोरले. तेथे शेजारीच राहणाऱ्या विजय सोनावणे याचेही बंद घर फोडून आत प्रवेश करुन घरातील सर्व कपाटे उघडून कपडे बाहेर काढली, पण या घरातील सर्वजण मुंबईला राहत असल्याने त्यांच्या घरातून नेमकी चोरी काय झाली ते समजलेले नाही.
वाई वाठार रस्त्यावर असणारे शिवाजी कदम यांचेही घर फोडून कपाटात ठेवलेल्या एका डब्यातील १५ हजार रुपये रोख व फिक्स डिपॉझिट पावत्यासह इतर ठेवलेली सर्व कागदपत्रे चोरटे घेऊन गेले. या घटनेची माहिती भुईंजचे सहाय्यक निरिक्षक रमेश गर्जे यांना समजताच सहकाऱ्यांना घेऊन त्यांनी घटनास्थळी पाहणी केली. दरम्यान घडल्या प्रकाराची माहीती जिल्हा पोलिसप्रमुख समीर शेख व वाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी बाळासाहेब भालचीम यांना दिली. त्यांनीही घटनास्थळी भेट दिली.
जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांनी तातडीने ठसेतज्ञ व डॉगस्कॉड ओझर्डे गावात पाठवले. दरम्यान याच पध्दतीने कदाचीत याच टोळीने वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील पसरणी, कुसगाव, सिध्दनाथवाडीतील बंद घरे फोडून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रकमा चोरल्या असाव्यात असा संशय व्यक्त केला जात आहे.