मुंबई – महान्यूज लाईव्ह
आज राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार रोहित पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले. यावेळी अजितदादांनी त्यांना जेवण्याचा आग्रह केला ही बातमी विधीमंडळात पसरताच सगळीकडे चर्चा सुरू झाली, मात्र त्यानंतर पत्रकारा्ंपुढे येत रोहित पवारांनीच याचे स्पष्टीकरण दिले.
रोहित पवार म्हणाले, चार विषय होते, ते राज्याशी व माझ्या मतदारसंघाशी निगडित होते. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न होता. परिक्षा शुल्क, युरीयाचे लिंकिंग हाही विषय होता. माझ्या मतदारसंघातील एमआयडीसी मंजूरीबाबत सरकारकडून तांत्रिक अडचणी आणल्या जात आहेत. यासंदर्भातील माहिती दादांना दिली. तसेच दादांना आंदोलनादिवशी जी कागदपत्रे मिळाली होती, त्यातील वास्तव मुद्दे दादांसमोर आणले गेले नव्हते, ती वास्तवातील कागदपत्रे व प्रत्यक्षातील त्यातील मुद्दे दादांपुढे मांडले. ते तपासावेत, तसेच मतदारसंघात युवांकडून आंदोलन सुरू आहे, त्यासंदर्भातील माहिती दिली, तेव्हा दादांना खरी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
रोहित पवार यांना दादांनी जेवण्याचा आग्रह केल्याची माहिती पत्रकारांनी विचारताच रोहित पवार म्हणाले, आम्ही राजकारण व कुटुंबाची नाती यात कधीच मिश्रण करीत नाही. नाते टिकवणे हे सर्वात महत्वाचे आहे. पण बाहेरून येऊन जर कोणी कुटुंब फोडण्याचा प्रयत्न केला, तर कुटुंबातील लोक कुटुंबातील सदस्याबरोबर नाही, बाहेरून येणाऱ्या लोकांशी दोन हात करतात. दादा जेव्हा माझ्यासमोरच एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सांगत होते, तेव्हा काही आमदारही आले होते व जेवणाची वेळ व व्यवस्था झाली होती, त्यामुळे जेवणासाठी दादांनी येण्याची सूचना केली.
दादा नेहमीच विधीमंडळाचा मान ठेवण्याबद्दल आग्रही अशतात. एखाद्या मंत्र्याने आश्वासन दिले आणि त्यावरून जर घुमजाव केले, तर दादा ते सहन करीत नाहीत. दादांनी एमआयडीसीच्या प्रश्नात स्वतः लक्ष घालतो असे सांगितले.
अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीसंदर्भात शपथपत्रे गोळा करण्याच्या सूचना केल्या आहेत, त्याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, ते त्यांचे काम करतील. आम्हीही आमचे काम करू. राजकारण व कुटुंब वेगळ्या गोष्टी आहेत. पवारसाहेबांना कुटुंब जेवढे महत्वाचे, तेवढेच महाराष्ट्राला ते कुटुंब मानतात, ते महाराष्ट्राचे कुटुंब एकसंघ ठेवण्यासाठी तेही ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील, त्या त्या केल्या जातील.