शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिरूर तालुक्यातील एक गाव असे आहे की या गावातील ग्रामस्थांचं म्हणणं आहे की, या गावाला 75 वर्षात रस्ताच झाला नाही. बाभुळसर बुद्रुक (ता. शिरूर) हे शिरूर तालुक्यातील सर्वात शेवटचे गाव. स्वातंत्र्यानंतरच्या काळात राज्यात अनेक सरकारे आली, तालुक्यामध्ये अनेक आमदार होऊन गेले, परंतु बाभळसर बुद्रुक ते म्हसोबावाडी या गावचा रस्ता आहे तसाच जैसे थे राहिला.
दरवर्षी पावसाळा आला की या रस्त्याच्या कामाची आठवण सर्वांनाच होते, कारण दरवर्षी पावसाळ्यात चिखलात ही वाट तुडवावी लागते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पावसात नागरिकांना चिखलात मार्ग काढत जावे लागत आहे.
स्वातंत्र्य मिळूनही गावचा रस्ता विकासापासून दुर्लक्षित राहिल्याने अखेर गावच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत खड्ड्यात वृक्षारोपण केले. यावेळी सरपंच दिपाली नागवडे यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षापासून बाभुळसर बुद्रुक या गावच्या रस्त्याची मागणी प्रलंबित आहे. शाळेतील मुलांना, दूध व्यवसाय करणाऱ्यांना, शेतकऱ्यांना, प्रवाशांना दररोज या रस्त्यावर ये-जा करण्यासाठी मोठे कसरत करावी लागते, मात्र याकडे कोणाचेच लक्ष नाही हे दुर्दैव आहे.
या वेळी उपसरपंच सुनील देशवंत, अंकुश नागवडे, सुनील नागवडे, मनीषा भंडलकर,कविता पाटोळे,रामदास नेते, संतोष टेकवडे, भाऊसो थोरात, संजय नागवडे,निरंजन नागवडे , दत्तात्रय पोपट ,अल्लाउद्दीन अल्वी, महेंद्र नागवडे,महेंद्र रणदिवे ,माणिक करपे,संतोष मचाले, पलांडे भोसले यांनी रस्त्यावर वृक्षरोपण करून रस्ता दुरुस्तीची मागणी केली.