सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर परिसरातील वृद्ध आता सुरक्षित राहिलेला नाही. काल वृद्ध महिलेस मारहाण करून तिच्या अंगावरील दागिने लुटण्याच्या घटनेने इंदापूर हादरले. भरदिवसा एका 80 वर्षीय वृद्ध महिलेस अज्ञात चोरट्याने दुचाकीवर घरी सोडण्याच्या बहाण्याने दुचाकी वर बसवत अज्ञातस्थळी नेत बेदम मारहाण केली.
यावेळी चोरट्याने गळ्यातील दागिने हिसकावताना व कानातील दागिने ओरबाडून काढल्याने महिलेस मोठ्या जखमा झाल्या आहेत. सद्यस्थितीला इंदापूर तालुक्यात फळ पिके घरफोडी, व इतर चोरीच्या घटनांमुळे शहरी व ग्रामीण नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. तालुक्यातील नागरिक चोरट्यांच्या उपद्रवांमुळे नागरिकांमध्ये असून असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान एका महिन्यात ज्येष्ठ नागरिकांना लुटल्याची ही दुसरी घटना इंदापूरमध्ये घडल्याने शहरातील ज्येष्ठ नागरिक कमालीचे घाबरले आहेत. याबाबत माहिती अशी की, गुरुवार (ता. 27) रोजी भर दुपारी बिजवडी ग्रामपंचायत हद्दीतील वनगळी गावच्या रहिवाशी असलेल्या रुक्मिणी पांडुरंग करगळ (वय-80 वर्षे) या सकाळी गावावरून इंदापूर शहरात औषधे खरेदीसाठी आल्या होत्या.
त्यांचे काम आटोपल्यावर दुपारी घराकडे परतत असताना शहरातील बाब्रस पेट्रोल पंपाच्या जवळ पाठीमागून लूना गाडीवर हेल्मेट परिधान करून आलेल्या व्यक्तीने पुढे सोडतो म्हणून वृद्ध महिलेस गाडीवर बसवले. त्यानंतर त्याने पंपावर पेट्रोलही टाकले व पुढे बाह्यवळण मार्गाने सरडेवाडी टोलनाक्याच्या दिशेने अज्ञातस्थळी नेत बेदम मारहाण करीत गळ्यातील व दोन्ही कानातील दागिने हिसका देऊन ओरबाडून काढले.
यामध्ये आजीच्या कानाला व गळ्याला गंभीर दुखापत झाली.यावेळी चोरट्याने मारहाणही केली. यामुळे महिलेच्या हात, पाय, गळा ,कान यांना गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांच्यावर इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अगोदरच उजनीच्या पाणलोट क्षेत्रासह इंदापूर शहरातही चोरट्यांचा उतमात सुरू असताना दिवसाढवळ्या वृद्धांना लुटले जात असेल, तर पोलीस यंत्रणा याबाबत कुठेतरी कमी पडते आहे असे दिसत आहे. पोलीस यंत्रणेने आपली यंत्रणा अधिक सतर्क करण्याची गरज असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे. एकूणच चोरट्यांचे फुटलेले पेव कायम रोखण्यासाठी पोलिसांसमोर आव्हान आहे.