मुंबई : महान्यूज लाईव्ह
राज्य सरकारने एका नव्या विधेयकाला मंजूर देताना वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या हल्ल्याबाबत नुकसान भरपाई करता सुस्पष्ट नियम केले आहेत या नव्या कायद्यानुसार वन्यप्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात झालेल्या नुकसानीची भरपाई 30 दिवसांत पीडितास न मिळाल्यास त्या रकमेवर व्याज देण्यात येईल आणि ते व्याज संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल केले जाणार आहे.
हे विधेयक विधिमंडळातील दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले. विधान परिषदेतही हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. दरम्यान या विधेयकाबरोबरच या पुढील काळात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात दिली जाणारी नुकसानभरपाई वाढवली जाणार असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्य व पाळीव प्राण्यांची प्राणहानी होते. तसेच गंभीर इजा ही होते. त्याचप्रमाणे शेती, फळबागा तसेच घरांचे नुकसानही होते. या सर्व प्रकारच्या नुकसानाच्या व्याख्या करून त्यांची भरपाईची रक्कम भरघोस वाढविण्याकरता प्रस्ताव विचाराधीन आहे. मात्र, जी काही नुकसान भरपाई पिडितास मिळते ती देखील 30 दिवसांत मिळाली पाहिजे, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यास जबाबदार धरून भरपाईच्या रकमेवरचे व्याज त्याच्याकडून वसूल करून पीडितास देण्याची तरतूद आज मंजूर झालेल्या विधेयकात करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
स्थानिक विधानसभा सदस्यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरावर वन समित्या बनत आहेत, त्या समित्यांवर स्थानिक विधान परिषद सदस्यांना उपाध्यक्ष म्हणून घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. विविध लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार जुन्नर येथे बिबट सफारी स्थापण्यात येईल. या बिबट सफारीसाठी 80 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांना सांगितले.