चंद्रपूर : महान्यूज लाईव्ह
अस्मानी संकट कोसळलं की ज्या पावसाच्या पाण्याची आपण आतुरतेने वाट पाहतो, ते किती जीवघेणं असतं, याचा देखील अनुभव प्रत्येक जण घेत असतो. महाराष्ट्रातल्या चंद्रपूर जिल्ह्याने यंदाच्या पावसाळ्यात सगळ्यात मोठा धक्का अनुभवला. 24 तासात पाच वेगवेगळ्या घटनांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सहा जणांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. यातील बहुतेक घटना या शेतात काम करत असताना घडलेल्या आहेत हे येथील आणखी एक दुर्दैव!
चंद्रपूर जिल्ह्यातील या सहा जणांसह राज्यभरात वीज पडून मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या दहावर पोहोचली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाही तालुक्यातील शेतात काम करत असलेल्या शेतकरी कल्पना जोडे व अंजना पुसतोडे या दोन महिलांचा वीज पडून मृत्यू झाला.
याच जिल्ह्यातील गोडपिंपरी तालुक्यातील चिवण्डा येथे वनविभागाच्या कामावर पावसाळ्याच्या काळात रोपे लावली , तर नंतर उन्हाळ्यात तग धरतात, म्हणून वृक्ष लागवड करणाऱ्या वनमजुरांपैकी गोविंदा टेकाम या वनमजुराचा वीज पडून मृत्यू झाला.
तिसरी घटना देखील चंद्रपूर जिल्ह्यातीलच असून कोरपना तालुक्यातील खैरगाव येथे पिकावर फवारणी करताना पुरुषोत्तम परचाके या २५ वर्षीय शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील बेटाळा येथील घटनेने अनेकांच्या डोळ्यात पाणी आणले. शेतात काम करण्यासाठी गेलेल्या गीता ढोंगे या महिलेचा शेतातून परतताना वीज पडून मृत्यू झाला.
अशीच घटना चंद्रपूर जिल्ह्यातीलच फॉर्म भरणा तालुक्यात देखील घडली या ठिकाणी अर्चना मडावी या महिलेचाही वीज पडून मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. एका जिल्ह्यातील सहा जणांचा विज पडून मृत्यू झाला , त्यामुळे वीज प्रवण क्षेत्रासाठी काही उपाययोजना करण्यावर देखील राज्य सरकारकडून चर्चा केली जात आहे.