जीवन सोनवणे : महान्यूज लाईव्ह
भोर : भोर तालुक्यातील भाटघर धरण पाणलोट क्षेत्रात जिथे वारेमात भात पिकायचा तिथे आता व्यावसायिक शेतीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे इथल्या माळरानावर काश्मीरचे सफरचंद फुललं आहे. इंद्रायणी तांदूळाचे आगार असलेल्या बारे खुर्द गावात प्रयोगशील शेतकरी सौरभ दत्तात्रय खुटवड आणि अजय दत्तात्रय खुटवड यांनी सफरचंदाची शेती यशस्वी करून दाखवली आहे. सध्या बांधावरच ही फळे विकली जात असून दोनशे रुपये प्रति किलो या दराने सफरचंद विकले जात असल्याचे खुटवड बंधूंनी सांगितले.

२०२२ मधील मार्च महिन्यात १५ फुट बाय १५ फुट अंतरावर सफरचंदाची लागवड केली. बायफ संस्थेने रोपे विनामूल्य दिली. २०२१ मध्ये डोंगर उतारावर असलेले माळरान फोडून सपाटीकरण करून माळरान शेती करीता तयार केले. लागवड करण्यापूर्वी माळरानाची उभी आडवी नांगरट करून घेतली.
सफरचंद लागवडीसाठी ३ फुट बाय ३ फुट चौरस खड्डे घेतले. ४ ते ५ दिवस खड्डे तापून दिले. त्या नंतर खड्डे
पाण्याने भरून घेतले . त्यामुळे खड्ड्यातील उष्णता कमी झाली. नंतर शेण खत, निंबोळी पेंड, एस एस पी, १०:२६:२६ खते, गाळाची माती भरून खड्डे भरून घेतले नंतर पाणी दिले. जमीन वाफश्यावर आल्यावर एच आर एम ९९, गोल्डन डोरसेट, अॅपल अॅना जातीच्या रोपाची १० गुंठे क्षेत्रावर ४० रोपाची लागवड केली.
लागण केल्यानंतर दर १० दिवसांनी जीवामृत प्रती झाड एक लीटर या प्रमाणात दिले. तसेच दर १० दिवसांनी निमार्क व दशपर्णी अर्काची फवारणी केल्याने किड आटोक्यात आणली. सफरचंद लागवड केल्यानंतर आंतरपीक म्हणून झेंडूची लागवड ऑगस्ट २०२२ ला केली लागवड करण्या पूर्वी ३ फुट रुंदीचे गादी वाफे तयार करून गांडूळ खत भरले कलकत्ता जातीच्या रोपाची लागवड केली झेंडू मधून २० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.
त्यामुळे पाणी , सेंद्रिय खते, सेंद्रिय किटकनाशके यांचा खर्च यातून निघाला. पाणीपुरवठा करीता ३५ मीटर बाय ४५ मीटर येवढे शेत तळे तयार केल आहे ठिबकचा वापर करून पाणी दिले जाते.यंदा आंतरपीक म्हणून सोयाबीन घेतले आहे.
दर ३ महिन्याला झाडाची छाटणी केली .तसेच छाटणी झाल्यावर प्रती झाड १ किलो गांडूळ खत दिले. मार्च २०२३ मध्ये छाटणी केल्या नंतर फुल धारणा सुरू झाली एप्रिल २३ मध्ये फळात रूपांतर होण्यास सर्वात झाली. जुन २३ फळांना रंग येण्यास सर्वात झाली. जुलै २३ सफरचंद पिकून तयार झाले. सुनील चव्हाण , धीरज देशमुख ,अक्षय माने, ओंकार दळवी यांनी मार्गदर्शन केले. सध्या साधारणतः प्रती झाड पाच किलो फळे मिळत आहे. या फळांची विक्री शेतावरच होते आहे.२०० रुपये किलो दराने विक्री केली जाते आहे.
दत्तात्रय खुटवड – प्रगतशिल शेतकरी बारे खुर्द (ता. भोर) : नोकरीच्या मागे न धावता वडिलांचा वडिलोपार्जित शेती व्यवसाय आपल्या मुलांनी आनंदाने स्वीकारला असून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेती करत, कमी वेळेत, कमी जागेत, जास्तीत जास्त उत्पादन मुले शेतातुन घेत आहेत. यापुढेही शेतात नवनवीन प्रयोग राबवित वेगवेगळी पिके घेणार आहोत.