इंदापूर : महान्यूज लाईव्ह
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकी संदर्भातील मतदार यादीवरील आक्षेपावर सुनावणी सुरू आहे. सभासदांचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व त्यांची सहकारी करत आहेत. म्हणून त्या विरोधात आम्ही सर्व संचालकांनी अशी कितीही आव्हाने आली, तरी सभासदांना मतदानाचा हक्क मिळवून देण्याची न्यायाची लढाई सुरू केली आहे असे छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी सांगितले.
ते म्हणाले की, आम्ही छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या 23 हजार सभासदांसाठी एक लढाई लढत आहोत. छत्रपती कारखान्याच्या मतदार यादीत सरकारी अध्यादेशानुसार 22990 सभासद पात्र असल्याने त्यांना मतदार यादीत समावेश करण्यात आले आहे. परंतू थकबाकीदार आणि शेअर्सची थकबाकी असलेल्या किंवा ऊस न घालण्याच्या कारणास्तव 14 हजार सभासदांची नावे मतदार यादीतून वगळावीत असा आक्षेप दाखल करण्यात आला आहे, परंतु असे झाले तर कारखान्याच्या मतदारसंघांची संख्या ही 8 हजार सभासदांवर येईल.
त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे ज्या सभासदांनी काळजीपूर्वक कारखान्याचे भाग भांडवल घेऊन कारखानाला पाठबळ दिले, त्यांना नैसर्गिक व इतर कारणांनी ऊस घालता आला नसेल, परंतु त्यांचा मतदानाचा हक्क हिरावून घेणे योग्य होणार नाही. त्यांच्या रजा वार्षिक सर्वसाधारण सभेने या अगोदर क्षमापित केल्या असल्याने त्यांच्या मतदानाचा हक्क हिरावून घेता येणार नाही. आम्ही सर्वजण या सभासदांच्या हक्कासाठी लढत आहोत.
वास्तविक पाहता हजारो सभासदांना दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस पुरवणे शक्य नव्हते आणि जवळपास तीन वर्षाच्या कोरोनाच्या काळामुळे सर्वसाधारण सभेला उपस्थित राहता आले नव्हते अशा सभासदांची मतदानाचा हक्क न मिळाल्यास व त्यांना मतदानापासून वंचित केल्यास व या सभासदांनी कारखान्याकडे असलेली शेअरची रक्कम मागणी केली तर कारखाना ही रक्कम कुठून देणार? हा तर प्रश्न आहे. शिवाय संस्थेचे भागभांडवल कमी झाल्यामुळे कारखान्याला कर्ज मिळण्याची प्रक्रिया देखील अडचणी येऊ शकते.
शिवाय सहकारी साखर कारखानदारी ज्यांच्या जीवावर उभी राहिली. त्याच सभासदांना वगळणे हेही मानवतेच्या दृष्टिकोनातून योग्य होणार नाही. त्यामुळे सहकारी साखर कारखानदारी अडचणीत न आणता कारखान्याच्या 22 हजार 990 सभासदांना मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी आमची लढाई सुरू आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती चे संचालक मंडळ सातत्याने वास्तव आणि योग्य त्या दिशेने वाटचाल करत आले आहे. छत्रपती कारखान्याच्या यापूर्वीच्या मृत्यू अथवा निधन झालेल्या 4266 मतदारांना मुळ यादीतून वगळलेले आहे. अज्ञान पालककर्ता असलेले 248 तर 2400 सभासद हे थकबाकीदार म्हणून यापूर्वीच वगळले आहेत. त्यामुळेच एकूण 22,990 मतदार हे प्रारूप यादीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. सध्या मतदार यादीवरील हरकती तब्बल 595 असून त्यावर 21 जुलैपासून सुनावण्या सुरू आहेत.
आम्ही आत्ताच यावर बोलणार नाही, योग्यवेळी उत्तर देऊ : पृथ्वीराज जाचक
दरम्यान या विषयावर आत्ताच काही बोलणार नाही, कारण या बाबी न्यायप्रविष्ठ आहेत. फक्त एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की सातत्याने गाळप वाढत चालले असताना दुष्काळाचा प्रश्न येतो कुठे? असा सवाल कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी व्यक्त केला आहे. सभासदत्वाचा मुद्दा नाही तर थकबाकीदार सभासदांना फक्त मतदानाचा अधिकार न देण्याचा मुद्दा आहे. अर्थात आताच आम्ही काही बोलणार नाही, वेळ आल्यावर सविस्तर सांगूच असे त्यांनी स्पष्ट केले.