जीवन सोनवणे : महान्यूज लाईव्ह
घाटमाथ्यावरील पावसाची स्थिती व संभाव्य शक्यता लक्षात घेऊन भोर व वेल्हे तालुक्यातील पोलीस पाटील पदाच्या एक ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षा स्थगित करण्यात आलेल्या आहेत. भोर व वेल्हे तालुक्यातील रिक्त पोलीस पाटील पदांसाठी १ ऑगस्ट २०२३ रोजी ही परीक्षा होणार होती मात्र उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी ही परीक्षा स्थगित करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
या भरती प्रक्रिया संदर्भात तीन जुलै 2023 रोजी अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर आलेल्या अर्जामध्ये छाननी करून पात्र उमेदवारांची यादी 24 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. भरती प्रक्रीयेबाबत कालबद्ध कार्यक्रमानुसार मंगळवार १ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता परीक्षा होणार होती.
भोर उभागातील भोर व वेल्हे हे दोन्ही तालुके दुर्गम घाटमाथ्यावरील डोंगराळ व अतिवृष्टीच्या परिसरातील असल्याने सध्याचा मुसळधार पाऊस लक्षात घेत ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. वास्तविक पाहता तालुक्यातील अनेक गावांमध्ये डोंगराळ भौगोलिक स्थिती असल्याने दरड कोसळणारी ठिकाणं म्हणून त्यातील काही गावाकडे पाहिले जाते. नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी महसूल यंत्रणा आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात व्यस्त आहे.
दोन्ही तालुक्यांच्या घाट माथ्यावर पावसाचे प्रमाण अधिक असल्याने ही परिस्थिती लक्षात घेता नियोजित लेखी परीक्षा घेणे प्रशासकीय कारणास्तव शक्य होणार नसल्याने १ ऑगस्ट रोजी नियोजित लेखी परीक्षा पुढील तारखेपर्यंत तूर्त स्थगित करण्यात आली आहे. भोर उपविभागीय कार्यालयाकडून लेखी परिक्षेचा दिनांक व स्थळ तसेच त्यापुढील कालबद्ध कार्यक्रमाबाबत अवगत करण्यात येईल, असेही कळविण्यात आले आहे.