पुणे : महान्यूज लाईव्ह
ही घटना पुण्यासारख्या प्रगत शहरातील! हडपसर भागात उसने घेतलेले पैसे परत दिले नाहीत, म्हणून ज्याने उसने पैसे घेतले होते, त्याच्या पत्नीवर खाजगी सावकाराने पतीसमक्ष बलात्कार केला आणि या प्रकरणाचा व्हिडिओ देखील तयार केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला.
पुण्यातल्या हडपसर भागामध्ये फेब्रुवारी महिन्यात हा प्रकार घडला. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात इम्तियाज हसीन शेख या 47 वर्षी नराधमावर गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित महिलेच्या पतीने इम्तियाज हसीन शेख याच्याकडून पैसे उसने घेतले होते.
घेतलेले उसने पैसे पिडित महिलेचा पती वेळेत देऊ शकला नाही, म्हणून इम्तियाज शेख याने या दोघा नवरा बायकोला जीवे मारण्याची धमकी देत हडपसर मधील म्हाडा कॉलनीतील घरी बोलावले. चाकूचा धाक दाखवत महिलेच्या पतीला समोर बसवून त्याने तक्रार महिलेसोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. एवढ्यावर न थांबता या घटनेचा व्हिडिओ त्याने मोबाईल मध्ये घेतला.
त्यानंतर हे नवरा बायको गप्प बसल्याचे लक्षात येताच इम्तियाज शेख याने संबंधित महिलेला सातत्याने ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. महिलेने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला म्हणून तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यावरून या महिलेने हडपसर पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांकडे फिर्याद दिली.