विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
तर मंडळी ३ जुलै, ८ जुलै.. मग १३ जुलै आणि शेवटी शेवटी २३ जुलै.. सारे मुहूर्त वाया गेले.. देवाच्या सोन्याच्या जेजूरीत अखेर शासन दारात आलंच नाही.. शासन आपल्या दारी आणि लाभार्थी एकदाचे म्हणतील याच सरकारची पुन्यांदा बारी.. पण तसं काही घडलं नाही.. आता एकदाचा तो मंडप काढून टाकायचं काम चाललंय बघा.. मी काय म्हणतो मंडपासाठी निवडलेली जागेचा तर काय प्रॉब्लेम नव्हता ना?
आता मंडपवाला तरी किती दिवस बसंल हो? प्रत्येक वेळी लग्नाचा मूहूर्त काढावा आणि कधी नवरदेव तर कधी नवरी.. तर कधी मामा.. जावईच रूसून बसावेत किंवा कोणी तरी ढगात गेलं म्हणून मुहूर्त पुढे ढकलला जावा असंच काहीसं मंडपवाल्याचं झालं असावं.
तर मंडळी जेजूरी येथील नियोजित शासन आपल्या दारी योजनेचा हा मंडप काढायचं काम सुरूय. या मंडपाचा खर्च लय भारीभक्कम असतो.. म्हणजे फूटावारी मंडपाचे पैसे असतात बरं का? जेजूरीत शासन आपल्या दारी येणार होतं.. आलं तर नाहीच.. पण दाखल्यांपासून औजारांपर्यंत आता तरी आपली वैयक्तिक लाभाची योजना मार्गी लागणार म्हणून आशेनं डोळं लावून बसलेल्या लाभार्थ्यांच्या या आशेवर सरकारी पाणी फिरलं…
बरं योजनेचा लाभही मिळणार.. शिवाय व्हेज का नॉनव्हेज असंही विचारून घेतलं होतं तलाठ्यांनी… त्याच्यामुळं तोंडाला पाणीही सुटलं होतं काहींच्या.. पण जागरण गोंधळात ऐनवेळी मिठाचा खडा पडावा तसंच काहीसं झालं..
जेजूरीला शासन पहिल्यांदा ३ जुलैला दारात येणार व्हतं.. त्याच्या आदल्या दिवशी राज्यात राजकीय भूकंप झाला.. अन मूहूर्त ८ जुलैवर पोचला.. मग ८ जुलैसाठी निरोपही गेले, तालुक्यातालुक्यात.. पण तोही मूहूर्त फिसकटला.
मग १३ जुलैची तयारी जोर्रात सुरू झाली. मंडप ओके झाला.. त्याच दिवशी स्टेज कोसळलं होतं म्हणे.. पण लगेच सावरून घेतलं गेलं.. मग आवाजाचं टेस्टींग झालं.. इकडं महसूलवाल्यांनी तलाठ्यांना, पोलिस पाटलांना एकदम ओके तयारी करायला लावली. लाभार्थ्यांनाही कोणत्या बसमध्ये बसायचं हे सांगायची रंगीत तालिमही झाली.. शिवाय व्हेज खाणार का नॉनव्हेज खाणार हेही विचारून झालं होतं.. एकतर लाभ मिळणार.. शिवाय चमचमीत खायला मिळणार म्हणून लाभार्थीही नाही म्हणलं तरी खूष होते.. पण अचानक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीच दिल्लीला गेले.. त्या दिवशीचा बेतच कोसळला..
मग २३ जुलैला नक्कीच.. म्हणजे नक्कीच असं सांगून मंडपवाल्याला जराशी दम राखायला सांगितलं.. आता शेवट म्हणजे शेवट बरं का असं मंडपवालाबी बोलला असणार.. मग २३ जुलैची तयारी सुरू झाली.. पाण्यावानी पैसा गेला तरी चालेल, पण सुट्टी द्यायाची नाय अशा थाटात कार्यक्रमाची तयारी झाली.. पण हाय रे दैवा.. खंडेरायाच्याच मनात नव्हतं काय कुणास माहित? २३ जुलैचाबी मुहूर्त गळला.. मग मात्र मंडपवाल्याचा धीर खचला.. त्यानं समदा बाडबिस्तारा आवरायला घेतला…