दौंड : महान्यूज लाईव्ह
राज्यात देव – दानव युद्धासाठी दौंड तालुक्यातील कुसेगाव आणि खेड तालुक्यातील कोयाळी येथील जागृत देवस्थान श्री. भानोबा देव प्रसिद्ध आहे. या देवाच्या अंगावरील नोटांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस झाला आहे. या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात तिघांवर चोरी चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बबन महादू कोळेकर (वय-६०), सिताराम महादू कोळेकर (वय-६५), दत्तात्रय विठोबा कोळेकर (वय-६०, सर्व राहणार. कोयाळी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. ही घटना ७ ऑक्टोबर २०२२ ते ५ मे २०२३ या दरम्यान घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहिती अशी की, कोयाळी येथील ग्रामदैवत श्री भानोबा देव मंदिरात सदर आरोपींनी मागील वर्षभरात कोणाच्याही परवानगीशिवाय श्री. भानोबा देवाच्या समोरील व अंगावरील पन्नास व शंभर रुपयांच्या एकूण २ हजार ७०० रुपयांच्या नोटा काढून घेतल्या आहेत.
याबाबत बाळकृष्ण तात्याबा कोळेकर (वय-५३, रा. कोयाळी चाकण) यांनी सोमवारी (ता.२४) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांवर आळंदी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास आळंदी पोलीस करीत आहेत.