मुंबई – महान्यूज लाईव्ह
कर्जत- जामखेडसाठी एमआयडीसी मंजूर करावी या मागणीसाठी विधीमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आंदोलन करणाऱ्या रोहित पवार यांना उद्योगमंत्र्यांना दुसऱ्याच दिवशी आपण बैठक घेणार असल्याचे जाहीर करावे लागले होते, मात्र आज दुपारी होणारी नियोजित बैठक आज झालीच नाही, कारण रोहित पवार थांबून तर राहीले, मात्र उद्योगमंत्री आलेच नाहीत.
आज दुपारी नियोजित बैठक असल्याने रोहित पवार व एमआयडीसीचे अधिकारी बैठकीसाठी पोचले. मात्र उद्योगमंत्री काही आले नाहीत. आता येतील, पाच मिनीटांनी येतील असे सांगितले जात होते, मात्र प्रत्यक्षात पाच तास थांबूनही उद्योगमंत्री आलेच नाहीत.
शेवटी उद्योगमंत्र्यांनी ही बैठक रद्द केल्याचे सांगितले. दरम्यान ही बैठक राजकीय कारणानेच रद्द झाल्याचे मत व्यक्त करण्यात आले. दुसरीकडे परकीय गुंतवणूकीविषयीची एक बैठक लांबल्याने ही बैठक रद्द झाल्याचे उद्योगमंत्र्यांकरवी सांगण्यात आले. मात्र आता ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याने रोहित पवार काय पवित्रा घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रोहित पवार यांनी उद्योगमंत्र्यांनी जर चालढकल केली, तर कर्जत-जामखेडमधील हजारो युवक या ठिकाणी येऊन आमरण उपोषण करतील असा इशारा दिला होता. आता रोहित पवार काय करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.