सुरेश मिसाळ – महान्यूज लाईव्ह
उजनीच्या काठावर रात्रीस ड्रोनचा खेळ चालतोय.. आणि त्याने फक्त शेतकरीच नाही, गावकरीही रात्र जागून काढतोय.. गेल्या तीन ते चार दिवसांपासून इंदापूर तालुक्यातील लोणीदेवकर, अगोती, कालठण, चांडगाव, गंगावळण, गांजेवळण, कळाशीसह आसपासच्या आठ ते दहा गावांत हे ड्रोन फिरताहेत. काही दिवसांपूर्वी बारामतीतील वैमानिक प्रशिक्षण केंद्राच्या तज्ज्ञांनी छोटी विमाने असल्याची माहिती यापूर्वी दिली होती, मात्र सध्या दिसत असलेल्या लाईटस हे विमाने नसून ड्रोन असल्याचा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.
रात्रीच्या दहा वाजल्यापासून या ड्रोनचा खेळ सुरू होतोय.. विशेष म्हणजे रात्री दहा ते पहाटे अगदी एक वाजेपर्यंत विविध ठिकाणी हे ड्रोन दिसताहेत. एक, दोन नव्हे तीन पेक्षाही अधिक ड्रोन या भागात फिरत असल्याचे शेतकरी व गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे जेव्हापासून हे ड्रोन फिरत आहेत, तेव्हापासून परिसरातील तीन गावांमध्ये लहानमोठ्या चोऱ्या घडल्या आहेत. काहीजणांना भिती आहे की, मध्यंतरी सोलापूर जिल्ह्यात ड्रोनच्या सहाय्याने डाळींबाची चोरी करण्यात आली. मात्र येथे पिकांच्या भोवती नाही, तर गावात हे ड्रोन फिरत आहेत, त्यामुळे नक्की यामागचा हेतू काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे ड्रोन अगदी पन्नास ते साठ फुटांपर्यंत खाली येत असल्याने ते नेमकी कशाची रेकी करीत आहेत असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. अनेकांच्या मनात अनेक शंका असून यासंदर्भात नागरिकांनी पोलिसांशीही संपर्क केला आहे. पोलिसही या ड्रोनच्या मागचा मोहरा शोधत आहेत.