सुरेश मिसाळ – महान्यूज लाईव्ह
एका शेतकऱ्याचा वीजपंप १९ जुलै ते २० जुलैच्या दरम्यान चोरीला गेला.. त्याची दखल भिगवणच्या सहायक निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने अशी घेतली की, गुन्हेगारीची पाळेमुळे उखडताना त्यांच्या हाती घबाड लागले.. दोन गुन्हेगारी टोळ्यांसह मोबाईल चोरांचे सारे समूळ शोधताना चोरी केलेले १९ वीजपंप..३ दुचाक्या.. १० मोबाईल.. एक फ्रिज, टिव्ही…तब्बल ८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला..
भिगवण पोलिसांनी आणखी एक दमदार कामगिरी प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केली. १९ जुलै रोजी रात्री दहा ते २० जुलैच्या पहाटेपर्यंतच्या कालावधीत डाळज नंबर २ गावच्या हद्दीत तलावाच्या पायथ्याशी अवधूत दादासाहेब जगताप यांच्या मालकीचा वीजपंप चोरीला गेला. त्याची फिर्याद भिगवण पोलिसांकडे दाखल झाली होती.
त्याची गंभीर दखल जिल्हा पोलिस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे या्ंनी घेतली व त्यांनी सहायक निरीक्षक दिलीप पवार यांना सूचना केली. त्यानुसार पवार यांनी फौजदार रुपेश कदम, विठ्ठल वारघड, सचिन पवार, महेश उगले, अंकुश माने, हसीम मुलाणी, अप्पा भांडवलकर यांच्या पथकाच्या माध्यमातून या चोरट्यांचा बंदोबस्त करायचे ठरवले.
भिगवण परिसरात सातत्याने वीजपंप चोरीला जात असल्याची शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हे पथक तांत्रिक बाजूंबरोबरच परिसरातील गुप्त बातमीदारांचेही जाळे पेरून होते. अखेर तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्या माहितीवरून पोलिसांनी विश्वजित उर्फ सुंदर तुकाराम ढवळे (वय २३ वर्षे), रोहन उर्फ सखाराम डोंबाळे (वय २१ वर्षे) दोघेही रा. मदनवाडी. ता. इंदापूर) या दोघांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडे पोलिसांनी सखोल चौकशी केली.
या चौकशीत दोघांकडून फक्त याच चोरीचा नाही, तर आतापर्यंतच्या अख्ख्या चोऱ्यांचे गुन्हेच उकलून काढले. या दोघांनी अनेक गुन्हे केल्याचेही निष्पन्न झाले. या दोन वर्षात या दोघांनी भिगवण परिसरातच १२ चोऱ्या केल्या होत्या. या चोऱ्यांमधील पावणेतीन लाख रुपये किंमतीचे १९ वीजपंप पोलिसांनी हस्तगत केले.
याच तपासादरम्यान पेट्रोलिंग करत असताना भिगवण पोलिसांना दोन संशयित व्यक्ती फ्रिज, एलईडी टिव्ही घेऊन जाताना दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व चौकशी केली. तेव्हा तेही सराईत चोरटे असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडील तपासातून पोलिसांनी ३ दुचाक्या, १ फ्रीज, १ एलसीडी टिव्ही असा २ लाख ५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.
भिगवण पोलिसांनी आणखी एका तपासादरम्यान २०२२ ते २०२३ या कालावधीत पोलिस ठाण्यात आलेल्या तक्रारींवरून केलेल्या तांत्रिक तपासातून १० मोबाईल हस्तगत करून ३ लाख ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. अशा तीन वेगवेगळ्या चोऱ्यांचे प्रकार पोलिसांनी उघडकीस आणले.