इंदापूर – महान्यूज लाईव्ह
महाविकास आघाडीची सत्ता गेली आणि इंदापूरात राष्ट्रवादीची अवस्था सांगता येत नाही आणि सहनही होत नाही अशी झाली. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आखून दिलेल्या नियोजनाप्रमाणे जिथे भाजपचे आमदार नाहीत, त्या तालुक्यातील आमदारांनी सुचवलेल्या कामांची माहिती अगोदरच भाजपच्या नेत्यांना दिली जाऊ लागली आणि मग भाजपच्या स्थानिक नेत्यांना बळ देण्यासाठी त्यांनीही तशाच कामांची यादी देण्याची नवी पध्दत सुरू झाली. या पध्दतीमुळे इंदापूरात भाजप व राष्ट्रवादीत दररोजच कामांचे श्रेय घेण्याची धडपड सुरू झाली आहे, आता हे थांबवण्याची संधी राष्ट्रवादीला आली आहे.
पुण्याचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे येणार आहे अशी चर्चा असून त्यामागे इंदापूरात भाजपने केलेली कथित नाटके कारणीभूत असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. राज्यात भाजप- शिंदे सरकार आल्यापासून इंदापूर तालुक्यातील कोणतीही विविध विकासकामे मंजूर झाली की, विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून दोन्ही कामांची एकत्रित यादी जाहीर केली जात आहे व दोन्ही कामे आपल्याच नेत्यांनी मंजूर केली आहेत असे जाहीर केले जात आहे.
या दोन परस्परदाव्यांमुळे सारेच संभ्रमात असून राजकीय कार्यकर्तेही या श्रेयवादाच्या लढाईला कंटाळले आहेत. त्यात आमदार दत्तात्रेय भरणे हे कोणत्याही कामाला आमदाराचीच मंजूरी लागते असे सांगून सांगून वैतागले आहेत. मात्र त्यांची काहीच चालत नाही, कारण कोणतेही काम असले तरी राष्ट्रवादी व भाजप दोन्हीही त्याच कामांचे श्रेय घेत आहेत असे चित्र आहे.
आता हे चित्र लवकरच संपेल असे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले असून एका पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ही भाजपची स्ट्रॅटेजी आहे. राष्ट्रवादी अथवा कॉंग्रेस कधीही एकमेकांच्या कामांचे श्रेय घेत नव्हते, मात्र आता वेगळीच पध्दत आली आहे. आपले सरकार राज्यात आहे, तेव्हा स्थानिक आमदारांचा प्रश्न येतोच कोठे? असे सांगत एखादा जिल्हा परीषद सदस्य देखील त्या त्या तालुक्यात मंजूर सारी कामे आम्हीच केल्याचा दावा करतो, जेणेकरून सारी विकासकामे भाजपनेच केली आहेत हे दाखविणे सोपे जावे अशी स्ट्रॅटेजी इंदापूरातही केली जात आहे, मात्र आता पुण्याचे पालकमंत्रीपद अजितदादांकडे येणार आहे, त्यामुळे दुसऱ्यांच्याही कामाचे श्रेय घेण्याचे राजकीय कारनामे लवकरच बंद होतील.