सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर तालुक्यात पाऊस लांबल्याने शेतातील पिके अडचणीत आली असून, पिण्याचे पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची कमतरता निर्माण होऊ लागली आहे.उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार इंदापूर तालुक्यातील शेतीसाठी भाटघरचे नीरा डावा कालव्यातून खरीप हंगामाचे आवर्तन रविवार (दि. 23) पासून सोडण्यात येणार आहे. अशी माहिती भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
खडकवासला धरणातूनही इंदापूर तालुक्यासाठी तातडीने आवर्तन सोडण्यात येणार असल्याचा निर्णय झाल्याचेही पाटील यांनी सांगितले. हर्षवर्धन पाटील म्हणाले, शनिवार अखेर भाटघर धरणात 48 टक्के एवढा समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. इंदापूर तालुक्यात पाऊस लांबल्याने शेतातील पिके अडचणीत आली असून, पिण्याचे पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची कमतरता निर्माण होऊ लागली आहे.
त्यामुळे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले तसेच पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डुबल यांच्याशी चर्चा होऊन भाटघर मधून नीरा डावा कालव्यामध्ये पाणी रविवार पासून सोडण्यात येणार आहे, सदरचे आवर्तन हे टेल टू हेड पद्धतीने इंदापूर तालुक्यातील 59 फाट्यापासून सुरू होईल. तसेच शेटफळ तलावात भरून घेण्याचा निर्णय झाला आहे.
त्याचप्रमाणे खडकवासला कालव्यातूनही इंदापूर तालुक्यासाठी शेतीसाठी तातडीने आवर्तन सोडण्याचा निर्णयही यावेळी सदर जलसंपदा अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेमध्ये घेण्यात आला आहे. नीरा डावा कालवा व खडकवासला कालव्यातून इंदापूर तालुक्यातील शेतीसाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय झाल्याने शेती बरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची अडचण आता राहणार नाही तसेच चाऱ्याचा प्रश्नही सुटणार आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.