घनश्याम केळकर
मणीपुरचा व्हिडिओ समोर आला आणि सगळ्या देशभर वेदनेची कळ उठली. सोशल मिडियावर दु:ख आणि संतापाचा पूर वाहिला. हजारो व्टिटर ट्रेंड झाले. मग सुप्रिम कोर्टाने दखल घेतली. पंतप्रधानांनी बरेच दिवसाचे मौन सोडले. जंतरमंतरपासून देशभर सगळीकडे आंदोलने झाली. विरोधी पक्षांनी सरकारवर झोड उठवली. शंभर दोनशे नव्या कविता जन्माला आल्या. सगळे कसे रितीप्रमाणे झाले. मणीपूरमध्ये हजारो महिला आजही आंदोलन करत आहेत, पण नॅशनल मिडियाने दुसऱ्याच दिवशी सीमा हैदरचे दळण दळायला घेतले.
भा. रा. तांबेंची एक कविता आहे.
“ सगेसोयरे डोळे पुसतील,
पुन्हा आपल्या कामी लागतील.
उठतील, बसतील, हसून खिदळतील.
तु जाता त्यांचे काय जाय .“
एखाद्या मृत्यूनंतर काय होईल याबाबतची ही कविता अशा घटनांनाही बरोबर लागू पडते. अशा घटना घडल्या की मला पुजा जाधव आठवते. त्या घटनेचा जर व्हिडिओ काढला असता तो जवळपास मणीपुरच्या व्हिडिओसारखाच दिसला असता. त्या घटनेला आता चौदा वर्षे होतील. आपण कसे शहाण्या बाळासारखे हातावर घडी आणि तोंडावर बोट ठेवून गप्प आहोत.
खरे तर या अशा घटना आपल्याला जाणीव करून देतात की जरी आपण माणुसपणाचा मेकअप आपल्या चेहऱ्यावर चोपडला असला तरी मुळात आपण एक पशू आहोत. आदिम टोळ्यांमध्ये स्त्रिया या मालमत्ता समजल्या जात. त्यामुळे जशी वेळ पडेल तसा त्यांचा किंवा त्यांच्या स्त्रीत्वाचा सौदा सहजपणे केला जात असे. आपल्या डीएनएमध्ये खोलवर हे पशुपण घुसून बसले आहे. मणीपूरमध्ये यापेक्षा वेगळे काही घडेल अशी शक्यताच नाही. बिल्किस बानुच्या तीन वर्षाच्या मुलीला तिच्यासमोर भिंतीवर आपटून मारले आणि ज्यांनी तिच्यावर बलात्कार केला, त्यांचे हार घालून केलेले स्वागत आपण पाहिलेच आहे. जम्मुमध्ये एका लहान मुलीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या आरोपीला न्यायालयात हजर करू नये म्हणून रस्ता अडविणारी शेकडोंची गर्दी आपण पाहिली आहे. महिनो न महिने महिला पहिलवानांनी आक्रोश केल्यानंतरही आज ब्रिजभूषण शरणसिंग तितक्याच निर्लज्जपणे हसताना दिसतो आहे.
निर्भया प्रकरणाचा अपवाद वगळता जवळपास एकाही प्रकरणात न्याय झालेला दिसत नाही. हैद्राबादच्या एक प्रकरणात चारजणांना इनकौंटर करून त्यांना ठार मारण्यात आले. त्यानंतरच्या चौकशीत हे चौघेही गुन्हेगार नसल्याचे पुढे आले आहे. खरे आरोपी आजही मोकाटच आहेत. तिथेही न्याय झाला नाही आणि मणीपूरमध्येही तो होणार नसल्याचीच खात्री आहे. आपल्या परिसरातल्या पुजा जाधवसारख्या मुलीसाठी रडायलाही आपल्याकडे वेळ नाही. हजारो किलोमीटर दूरवरच्या मणीपूरसाठी कुठून आसव आणणार आहोत. पुजा जाधव प्रकरणात ती गेल्यानंतर तिच्या स्त्रीत्वाचा सौदा केला गेला. मणीपूरच्या आयाबहिणी जिवंत असताना तो होईल.
१४ वर्षापूर्वी झालेल्या पुजा जाधव बलात्कार आणि खून प्रकरणाची अनेकांना माहिती नसेल. बारामतीपासून पंधरा सोळा किमी अंतरावर इंदापूर तालुक्यातील तावशी या गावाची ही घटना आहे. १४ वर्षापूर्वीच्या ३ ऑगस्टच्या दिवशी १४ वर्षाच्या पुजा जाधवचा बलात्कार करून खून करण्यात आला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रचंड गदारोळ झाला. लोक रस्त्यावर आले. प्रचंड मोठे आंदोलन उभे राहिले. पकडलेले आरोपी हे वजनदार राजकीय कुटुंबाशी संबंधीत होते. बारामतीच्या कोर्टात खटला चालला, साक्षीदार असलेले पुजा जाधवचे कुटुंबीय साक्ष देण्यासाठी कोर्टात आले नाहीत. अखेर पुराव्याअभावी आरोपींची सुटका केली गेली. त्यानंतर हे प्रकरण वरच्या कोर्टात नेण्याच्या योग्यतेचे नाही असा शेरा मारून फाईल बंद झाली आहे. मी जे लिहले त्याच्या आसपास बरेच काही घडले, ते काय घडले असेल त्याचा अंदाज तुम्ही करु शकता. त्यानंतर गेली चौदा वर्षे महिलांना न्याय देण्याच्या गप्पा मारणारे राजकीय नेते, गावपुढारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी या विषयावर तोंडातून ब्र शब्दही काढला नाही. त्यातल्या अनेकांना आता मणीपूरसाठी दु:खाचा कढ आला आहे.
यानंतर निर्भया प्रकरण झाले, जम्मूमध्ये झाले, उत्तरप्रदेशात झाले, हैद्राबाद झाले, नगर जिल्ह्यातील कोपर्डीत झाले. आता मणीपूरच्या घटनेनंतर जे काही घडते आहे, ते सोशल मिडियावरचा आक्रोश, आंदोलने, कोर्टकचेऱ्या सगळे सगळे प्रत्येकवेळी झाले. बहुतेक वेळेस शेवटचा रिझल्ट काय लागला तर स्त्रीत्वाचा सौदा झाला, कुणी आर्थिक सौदा केला, कुणी राजकीय सौदा केला.
त्यामुळे मणीपूरच्या भगिनींनो, मला माफ करा. तुमच्यावर खर्चायचा माझ्याकडे अश्रू नाहीत.
बाय द वे, पुजा आज जिवंत असती तर २८ वर्षांची असती, कदाचित तिचे लग्न झाले असते, तिला मुलेबाळे झाली असती. तिचे गुन्हेगार जर असतील तर त्यांचीही आता लग्ने झाली असतील, त्यांनाही मुले बाळे असतील. त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा त्यांच्या कुटुंबाला किंवा मुलाबाळांना मिळू नये ही ईश्वरचरणी प्रार्थना.
आणि शेवटी एक. ३ ऑगस्ट रोजी पुजा जाधवच्या स्मृतीसाठी एका पुरस्कार समारंभाचे आयोजन केले आहे. तुमच्या डोळ्यात जर काही आसव शिल्लक असतील ती ढाळण्यासाठी या कार्यक्रमाचे तुम्हाला निमंत्रण आहे.