दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : सोसाट्याच्या वाऱ्याने तालुक्यात ठिकठिकाणी रस्त्यावर वृक्ष उन्मळून पडल्याने काही वेळासाठी वाहतूक विस्कळीत झाली. तर जोर येथे विद्युत पुरवठा करणारा खांब पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. संबंधित विभागानी तातडीने उपाय योजना करीत रस्ते व वीज पुरवठा पुर्ववत सुरु केला.
गेले दोन दिवस वाई तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु असून पश्चिम भागात संततधार सुरु आहे. जिल्हा प्रशासनाने सावधानतेचा इशारा देत शाळा कॉलेजला सुट्टी जाहीर केली होती. मात्र पावसाने थोडी उसंत दिली, तरी सोसाट्याच्या वाऱ्याने जोर, जाभळी खोऱ्यात विविध ठिकाणी झाडे कोसळली. जोर येथे वीज वितरण कंपनीचा एक पोल जमीनदोस्त झाला होता.
यामुळे काहीकाळ गावाचा वीज पुरवठा खंडित झाला होता.याची माहिती वाई येथील उपकार्यकारी अभियंता पंकज गोंजारी यांना समजताच त्यांनी सहकारी अभियंता यांना घेऊन तातडीने तो पोल ऊभा करुन विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले. वीज कर्मचाऱ्यांनीही भर पावसात तो खांब उभा करुन पुन्हा विद्युत पुरवठा सुरळीत केला.
वाईहुन पाचगणी महाबळेश्वर कडे जाणाऱ्या पसरणी घाटात रस्त्यावर दत्तमंदिराजवळ एक वृक्ष उन्मळून पडला. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
याची माहीती उपअभियंता महेश गोंजारी यांना समजताच त्यांनी आपत्ती कालीन व्यवस्थापन पथकास तातडीने जेसीबी व कटरच्या साह्यानेे पडलेल्या झाडाचे तुकडे करून ते बाजुला करण्याचे आदेश दिले.
येथेही काही वेळातच या पथकाने झाडाचे तुकडे करुन ते बाजूला करुन रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. तर वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी भर पावसात पोल उभा करून वीज वाहिन्या जोडून विजपुरवठा पूर्ववत केला. युध्द पातळीवर वीज कर्मचारी आणी पिडल्बुडीचे पथक तातडीने अडथळे दुर करत असल्याने त्यांचे नागरिकांनी अभिनंदन केले.