बारामती – महान्यूज लाईव्ह
बारामतीचं शारदा प्रांगण हे अनेक ऐतिहासिक सभांनी गाजलंय.. हे प्रबोधनाचंही व्यासपीठ आहे. मात्र आज या मैदानाला जीवदानाचं व्यासपीठ बनविण्याचं काम राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहर शाखेनं केलं. निमित्त होतं महारक्तदान शिबीराचं.. एखाद्या मेळाव्यालाही गर्दी होणार नाही, एवढी गर्दी बारामतीत फक्त रक्त दान करण्यासाठी झाली होती.
अजित पवार नुकतेच उपमुख्यमंत्री झाले. त्यातील अनेक नाट्यमय घडामोडीनंतर पूर्वपदावर आलेल्या बारामतीकरांनी या रक्तदान शिबीराला मोठी गर्दी केली. विशेषतः युवक, पुरूषांच्या जोडीनेच युवती व महिलांनीही या शिबीरात गर्दी केली व रक्तदान केलं. या शिबीरासाठी मागील काही दिवसांपासून शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसने पूर्वतयारी केली होती. त्यामुळे आज सकाळपासूनच रक्तदानासाठी अगदी उत्सवी माहौल तयार झाला होता. दिवसभरात साडेतीन हजार रक्तदाते रक्तदान करतील असं आयोजक जय पाटील यांनी सांगितलं.
बारामती आणि अजित पवार हे नाते सर्वश्रृतच मात्र आज ६४ व्या वाढदिवशी अजित पवारांना आगळ्यावेगळ्या पध्दतीने शुभेच्छा देण्यासाठी जणू एक माहौल तयार झाला होता..
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वाढदिवस यंदा रक्तदानाच्या विशेष मोहिमेने साजरा करण्यात आला. दरवर्षी काही युवकांचे ग्रुप रक्तदान शिबीर आयोजित करतातच, याहीवर्षी राजमुद्रा ग्रुप, सोमनाथ गायकवाड व त्यांचे सहकारी तसेच नटराज नाट्य मंडळ आदींनी रक्तदानाची विशेष मोहिम राबवलीच, पण आज बारामती शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने महारक्तदान शिबीर शारदा प्रांगणात आयोजित करण्यात आले.