दौंड : महान्यूज लाईव्ह
राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे, मात्र दौंड तालुक्यात म्हणावा तशी पावसाने हजेरी लावली नाही. तालुक्यातील दुष्काळी भाग म्हणून जाणाऱ्या जिराईत पट्ट्यातील गावतलाव अद्यापही कोरडीच आहेत. परिणामी या भागातील शेत पिके धोक्यात आली असून पाणी टंचाईची समस्या जाणवत असल्याचे चित्र आहे.

मान्सूनचा जुलै महिना संपत आला आहे. पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी चांगल्या प्रकारे पाऊस प्रकारे पावसाने हजेरी लावली आहे, दौंड तालुक्यातील काही भागातही काही प्रमाणात पाऊस झाला असला तरी त्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण येत आहे, मात्र काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या आहेत तर काही भागात फक्त ढगाळ वातावरण होत असून पाऊस हुलकावणी देत आहे.
दौंड तालुक्यातील कुसेगाव, रोटी, वासुंदे, जिरेगाव, हिंगणीगाडा या भागातील उन्हाळ्यात कोरडे पडलेले गाव तलाव अद्यापही कोरडेच आहेत. विहिरीमधील पाणी पातळीही खालवली आहे. परिणामी या भागातील शेतकऱ्यांना पाण्याची समस्या जाणवत आहे. उसाची लागवड तसेच बाजरी तसेच इतर पिकांची पेरणी केलेली पिके धोक्यात आली असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा आहे.