दौंड : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बुथ तेथे भाजपा अभियान प्रभाविपणे राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात भाजप हा पक्ष एक नंबरवर नेण्याचा संकल्प आहे अशी माहिती भाजपाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी दिली.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच राज्यातील जिल्हाध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्या. पुणे जिल्ह्यात बारामती विभागात भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलेले दौंड भाजपचे नेते वासुदेव काळे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली आहे. या निवडीमुळे वासुदेव काळे यांच्या समर्थकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
या निवडीनंतर वासुदेव काळे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, पुणे जिल्हाध्यक्ष म्हणुन दिलेली जबाबदारी समर्थपणे संभाळून जिल्हयातील प्रत्येक बुथवर भाजपाचे संघटन अधिकाअधिक मजबूत करणार आहे. ग्रामीण भागातील युवक, शेतकरी व सर्वच घटकांना बरोबर घेऊन जिल्हा संघटनात्मकदृष्ट्या क्रमांक एकवर नेण्याचा प्रयत्न करणार आहे. भाजपामध्ये प्रवेश केलेले नविन कार्यकर्ते व पक्षबांधणीत मोलाची भूमिका पार पाडलेले जुने कार्यकर्ते यांचा योग्य मेळ घालून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षाचे जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
केंद्रातील मोदी सरकारने देशात अतिशय मोठया प्रमाणावर केलेल्या कामांचा प्रचार प्रसार करून राज्यातील महायुतीचे सरकार मध्ये जनसामान्यांची कामे वेगाने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
सन १९९५ मध्ये भाजपा युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष, सन १९९९ ते २००० दरम्यान जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहीले, त्यावेळी सोशल मिडीया नसताना व जिल्हयात पक्ष बांधणीसाठी आव्हानात्मक परिस्थिती असताना सुध्दा चांगले काम झाले आहे.
सन १९९७ साली भाजपाचे चिन्हावर पुणे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलो. तीन वेळा दौंड विधानसभेसाठी पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली. सलग चार वेळा बारामती लोकसभेचा निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहीले. भाजपा किसान मोर्चा उपाध्यक्ष, सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष, तसेच पुणे जिल्हा नियोजन समितीवर सदस्य अशा अनेक जबाबदाऱ्या पक्षाने दिल्या होत्या.
त्या पदांना न्याय देण्यासाठी व पक्षवाढीसाठी सर्वोच्च प्रयत्न केले आहेत. पक्षाने २४ वर्षानंतर पुन्हा जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली. सामान्य कार्यकर्ता ते दुसऱ्यांदा जिल्हाध्यक्षपद या पदाचा उपयोग हा पक्षबांधणी, केंद्र व राज्य सरकारची विकासकामे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी करणार आहे असा निर्धार जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी केला आहे.