बारामती : महान्यूज लाईव्ह
शेतकऱ्यांच्या एकजुटीला पुन्हा एकदा यश मिळाले असून, निरा डाव्या कालव्याच्या सलग अस्तरीकरणाच्या व निरा उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या कामाला सरकारने स्थगिती दिली. दरम्यान शेतकरी अजूनही सावध असून पुन्हा सरकार कधीही ठेकेदाराला हे काम करण्यासाठी मंजुरी देऊ शकते, ही शक्यता गृहीत धरून जागे राहण्याच्या सूचना शेतकऱ्यांनी केल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून निरा डावा व उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या कामाविरोधात शेतकरी एकवटले होते. हा संघर्ष दररोज वाढत वाढत चालला होता. सुरुवातीच्या काळात ठेकेदाराला जाऊन काम बंद करण्याच्या सूचना शेतकऱ्यांनी दिल्या तरी देखील ठेकेदार न जुमानता काम करू लागल्याने हे आंदोलन वाढवण्याचे प्रयत्न शेतकऱ्यांनी सुरू केले.
त्यासाठी गावोगाव बैठका सुरू झाल्या होत्या. बारामती तालुक्यातही माळेगाव मध्ये आणि काटेवाडी मध्ये हे काम बंद पाडले होते. परंतु पुन्हा हे काम सुरू राहत असल्याने शेतकऱ्यांनी गावोगावी एकत्र येऊन बैठका घ्यायला सुरुवात केली होती. या संदर्भात शेतकरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही जाऊन भेटले होते.
दुसरीकडे फलटण तालुक्यातही निरा उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणाला सुरुवात झाल्यानंतर जवळपास आठ ते दहा गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या कामाला विरोध केला. दरम्यान अनेक गावांमध्ये बंद पाळण्यात आला. तर अनेक गावांनी या अस्तरीकरणाच्या विरोधात ठराव देखील केले. यानंतर फलटणमध्ये मोठा मोर्चा शेतकऱ्यांनी काढला. ट्रॅक्टर मोर्चाही शेतकऱ्यांनी काढला.
या आंदोलनाची तीव्रता वाढत चालल्याचे दिसतच फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी विधानसभेत सरकारला जाब विचारला, तर दुसरीकडे शेतकरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले असल्याने त्यांच्याच मतदारसंघातील हा भाग असल्याने तातडीने त्यांनी या कामाला स्थगिती देण्यासंदर्भात सूचना केली आणि ठेकेदाराला यंत्रणा माघारी बोलावण्याचा सूचना केल्या.
काल संध्याकाळी काठेवाडी शेतकऱ्यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला अनेक गावातील शेतकऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते आणि शेतकरी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. याचवेळी सरपंच विद्याधर काटे यांच्या मोबाईलवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपर्क साधून अस्तरीकरणाच्या कामाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती दिली. तसेच हे आंदोलन तातडीने थांबवावे अशी सूचना देखील अजित पवार यांनी केली. याची माहिती सरपंच काटे यांनी शेतकऱ्यांना देताच शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.