सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या महत्वकांक्षी चांद्रयान – ३ मोहिमेमध्ये इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर (ता.इंदापूर) येथील वालचंदनगर कंपनीचा मोलाचा सहभाग आहे.उड्डाणाच्या पहिल्या स्टेजसाठीच्या महत्वाच्या उपकरणाची निर्मिती येथील कंपनीत केली गेली. कंपनीच्या माध्यमातून चंद्रयान -३ हे यान यशस्वीरित्या आकाशात झेपावले आणि सर्व कामगार व ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.
भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) च्या चांद्रयान-३ ही महत्वाकांक्षी मोहीम सुमारे चार वर्षापासून सुरू होती. संपूर्ण जगाचे लक्ष चांद्रयान मोहिमेकडे लागले होते. नुकतेच आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून चंद्रयान थ्री गगन भरारी यशस्वी ठरली. रॉकेटच्या सहाय्याने चांद्रयान आकाशाकडे झेपावले असुन रविवार दि. २३ ऑगस्टला चांद्रयान चंद्रावरती उतरणार आहे.
चांद्रयान मोहिमेच्या उड्डानासाठी वापरण्यात आलेल्या रॉकेटला सहा बुस्टर मोटर्स होत्या. यातील चार बुस्टर मोटर्सची (एस-२००) निर्मिती वालचंदनगर कंपनीने झाली आहे. यामध्ये हेड एन्ड सेगमेंट, मिडल सेगमेंट, नोझल एन्ड सेगमेंट तसेच प्लेक्स नोझल कंट्रोल टॅक या महत्वाच्या उपकरणाचा समावेश आहे. ही सर्व उपकरणे उड्डानाच्या पहिल्या स्टेज साठी वापरण्यात आली.यापुर्वी चांद्रयान – १ व चांद्रयान – २ मोहिमेमध्ये वालचंदनगर कंपनीचा मोलाचा वाटा होता. तसेच मंगळयान मोहिमेत देखील वालचंदनगर कंपनीचे योगदान होते.
स्वातंत्र्यपूर्व काळापासुन वालचंदनगर कंपनीचा देश उभारणीच्या कामामध्ये मोलाचा सहभाग राहिला आहे. एरोस्पेस, डिफेन्स,अणुउर्जा क्षेत्रामध्ये देखील कंपनी देशाच्या प्रगतीसाठी कार्यरत आहे. कंपनीने पाणबुडीसाठी महत्वाचे असणारे अनेक भाग ही तयार केले आहेत. गेल्या पाच दशाकापासुन वालचंदनगर कंपनी एरोस्पेस क्षेत्राशी संलग्न काम करीत असून अनेक महत्वाची उपकरणे तयार करीत आहेत.
चांद्रयान -३ मोहिमेच्या यशाबद्दल वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग दोशी यांनी कंपनीतील इंजिनिअर,कामगारांचे मनापासुन अभिनंदन केल्याचे कंपनीचे युनिट हेड धीरज केसकर यांनी माहिती दिली. भारताच्या महत्वाकांक्षी गगनयान मोहिमेसाठी महत्वाची उपकरणे बनविण्याचे काम वालचंदनगर मध्ये सुरु आहे. यातील काही उपकरणे कंपनीने तयार करुन इस्त्रोकडे हस्तांतर केली आहेत. तसेच अनेक उपकरणे बनविण्याचेही काम सुरु आहे. वालचंदनगर उद्योग समूहाच्या माध्यमातून जल, भूमी, आकाश क्षेत्रात खूप मोठा सहभाग असून गगनयानामध्ये कंपनीचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे