महाड : महान्यूज लाईव्ह
राज्यभरात काल 24 तासात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम असा की, रायगड जिल्ह्यातील खालापूर नजिक ईरसालगडाच्या पायथ्याशी असलेल्या ईरसालवाडीतील अख्खं गाव डोंगरावरील मातीचे डिगारे ढासळल्याने मलब्याखाली दबले आहे. या गावात दोनशे तीनशे लोक असण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
बुधवारची रात्री या गावासाठी काळरात्र ठरली. या गावात 50 ते 60 घरांची वस्ती असून 200 ते 300 लोक असल्याचे सांगितले जात आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार 30 ते 40 जण या ठिकाणी दबले असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून या घटनेत 50 ते 60 जणांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 25 जणांना सुरक्षित बाहेर काढल असून ते सुदैवाने वाचले आहेत, तर चार जणांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह बाहेर काढलेले आहेत, परंतु अजूनही अनेक लोक याठिकाणी दबलेले आहेत. सततच्या पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत.
या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये काहींना वाचवण्यात आले असून जवळपास 50 ते 60 जणांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीन मध्ये जवळपास दीडशे जणांचा मृत्यू झाला होता तर काही वर्षांपूर्वीच रायगड जिल्ह्यातीलच तळीये या गावातही जवळपास 44 लोकांचा मृत्यू झाला होता त्यानंतर आता हा इरसालवाडीतील घटनेमुळे लोकांच्या अंगावर शहारे आले आहेत.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची माहिती घेतली असून राज्याचे मंत्री उदय सामंत गिरीश महाजन दादा भुसे आदींनी घटनास्थळी पोहोचून मदत कार्याचा आढावा घेतला आहे दरम्यान या ठिकाणी राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापनाच्या तुकड्या पोहोचल्या असून अजूनही मातीचे ढिगारे कोसळत असल्याने मदत करण्यात अडथळा येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.