पुणे : महान्यूज लाईव्ह
दोन वेळा तारखांमध्ये बदल केल्यानंतर आता पुरंदर तालुक्यातील जेजुरीला शासन आपल्या दारी कार्यक्रम घेण्याचा मुहूर्त अखेर सरकारला सापडला. येथे 23 जुलै रोजी हा कार्यक्रम होणार असून, या निमित्ताने येणाऱ्या वाहनांकरता व होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन वाहतुकीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.
जेजुरी येथे २३ जुलै रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ व जेजुरी विकास आराखडा भूमीपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून लाभार्थ्यांना एसटी महामंडळाच्या बसेसने आणले जाणार आहे. इंदापूर बारामती, दौंड, पुरंदर, भोर, वेल्ह्यासह जिल्हाभरातील लाभार्थी या ठिकाणी येणार असल्याने वाहतुकीच्या नियोजनात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी बदल केले आहेत.
यामध्ये २३ जुलै रोजी पहाटे ५ वाजेपासून ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत पुणे ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ आणि पुणे ते बारामती या मार्गावरील जड, अवजड व इतर वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरीता जेजुरी सासवडकडे येणारी जड अवजड व इतर – वाहतुक पूर्णपणे बंद करुन त्यावरील वाहने ही निरा-मोरगाव-सुपा ते केडगाव चौफुला मार्गे पुणे-सोलापुर महामार्ग क्रमांक ६५ वरुन पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहेत. पुण्याकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करुन बेलसर- कोथळे- नाझरे सुपे-मोरगाव रस्ता मार्गे बारामती-फलटण- सातारा या मार्गे वळविण्यात येणार आहे.
बारामती व नीरा जेजुरीमार्गे पुण्याकडे जाणारी जड, अवजड व इतर वाहतूक पूर्णपणे बंद करुन ती मोरगाव- सुपा- केडगाव चौफुला मार्गे पुणे- सोलापूर महामार्ग क्रमांक ६५ वरुन पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहे. सातारा बाजुकडे जाणारी जड, अवजड व इतर वाहतूक पूर्णपणे बंद करुन सासवड- नारायणपूर-कापूरहोळ मार्गे सातारा – फलटण किंवा सासवड-वीर फाटा-परींचे- वीर- वाठार मार्गे लोणंद या मार्गे वळविण्यात येत आहे.