दौलतराव पिसाळ – महान्यूज लाईव्ह
वाई, दि. 19 : वाईच्या पश्चिम भागात मागील चोवीस तासात जोर व जांभळी खोऱ्यात मुसळधार पावसाने ओढे नाले तुडुंब भरून वाहत असून जोर गावातील सिमेंटच्या नळ्या टाकुन तात्पुरते स्वरुपाचे तयार केलेले दोन पुल वाहुन गेले आहेत. मागील चोवीस तासात जोर येथे 311 मी. मी. पावसाची नोंद झाली आहे.
सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसाने २२ जुलै 2021 मध्ये झालेल्या भुस्खलनाच्या आठवणींनी जोर गावचे ग्रामस्थ धास्तावले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पाठ फिरवलेल्या पावसाने आता धुमाकूळ घालण्यास सुरवात केली असून वाईसह महाबळेश्वर, प्रतापगड परिसरात गेल्या २४ तासांपासून तुफान पाऊस बरसतो आहे.
तसं पाहिल्यास वाईचा पश्चिम भाग पावसाचा आगार म्हणून ओळखला जातो. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाचा येथे जोरच नव्हता. मात्र जोर गावात झालेल्या प्रचंड पावसाने लोक धास्तावले आहेत. त्याचे कारणही असेच आहे. येथे २२ जुलै 2021 मधील महिन्यात भारतातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या चेरापूंजी पेक्षाही अधिक पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली होती.
अनेक जणावरे मृत्यूमुखी पडली, तर घरे मातीत गाडली गेली होती. कित्येकांना स्थलांतर करावे लागेल होते. या घटनेत मायलेकांचा मृत्यू झाला होता, मात्र त्यांचे मृतदेह आज अखेर सापडले नाहीत.
दरम्यान मागील २४ तासात या भागात मुसळधार पाऊस सुरु असून महाबळेश्वर पेक्षा जास्त पावसाची नोंद येथे झाली आहे. यामुळे या भागातील ओढे नाले तुडुंब भरून रस्त्यावरून वाहू लागले आहेत. माणसांना जीव मुठीत घेऊन त्यातून वाट काढावी लागत आहे.
पावसाचा जोर ओसरला नाही तर जोर भागातील गावांचा वाई प्रशासनाशी संपर्क तुटण्याची भिती वर्तवली जात आहे. काही ओढ्यावरील भराव व पूल वाहून गेल्याने वाहतूक करणे जिकरीचे झाले आहे. प्रशासनाने वेळीच सावधगिरी बाळगून याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत.
बलकवडी धरण परिसरात होणाऱ्या पावसाने धरणातील पाणी पातळी वाढली असून धरण 6४.८२ टक्के भरले आहे. धरणात येणारे पाणी 3893 क्यूसेक्स एवढ्या वेगाने येत आहे. तसेच या धरणक्षेत्रात ६७ मी.मी. इतकी पावसाची नोंद झाली आहे . मात्र अजूनही धरणातून धोम धरणात पाणी सोडण्यात आलेले नाही.