भंडारा – महान्यूज लाईव्ह
लाच कशात कोणी मागेल याचा भरवसा उरला नाही हे जरी खरे असले तरी कोणाकडून मागावी याची तरी लाज बाळगली पाहिजे. प्राचार्याने तेही महिला प्राचार्याने विद्यार्थ्याकडून हॉल तिकीट
देण्यासाठी १ हजारांची लाच मागितली. हा अत्यंत घाणेरडा व शिक्षण क्षेत्राला लाज आणणारा प्रकार भंडारा जिल्ह्यात घडला. शिक्षण क्षेत्राला काळिमा लावणारी ही घटना फक्त १ हजाराच्या मोहापायी घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी भंडाऱ्यातील महिला अध्यापक विद्यालयाची प्राचार्या जयप्रभा मारबते व या घटनेतील खासगी व्यक्ती अक्षय मोहनकर या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.
प्रथम वर्षात शिकणाऱ्या ३० वर्षीय विद्यार्थिनीची येत्या २० जुलैपासून परीक्षा सुरू होणार आहे. त्यासाठी प्रथम वर्षाच्या परीक्षेस बसण्यासाठी या विद्यार्थिनीकडे प्राचार्याने १ हजार रुपयांची लाच मागितली. हे जरा अतिच होतंय म्हणून या विद्यार्थिनीने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता जयप्रभा मारबते हिने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. एक हजार रुपये लाच, गैरहजर असल्यावरून ४४० रुपये असे १४४० रुपये मागितले व ही रक्कम मोहनकर याच्याकडे देण्यास सांगितले.
प्राचार्य मारबते हिच्या सांगण्यावरून मोहनकर याने ही रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला पकडले. त्यानंतर भंडारा शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागपूरचे पोलिस अधिक्षक राहूल माकणीकर, अपर पोलिस अधिक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक डॉ. अरूणकुमार लोहार, निरीक्षक अमित डहारे, फौजदार संजय कुंजरकर, अतुल मेश्राम, अभिलाषा गजभिये, राजकुमार लेंडे, अंकुश गाढवे, विवेक रणदिवे, मयूर शिंगणजडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.