दिल्ली – महान्यूज लाईव्ह
ही बातमी महाराष्ट्रातील नाही एवढे कौतुक वाटण्याचे कारण नाही, कारण स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्यांच्या यशोगाथा, कौतुकाचे पोवाडे गावागावात रचले जातात.. अन अगदी वर्षा-दोन वर्षातच त्या नवनियुक्त अधिकाऱ्याच्या घराचे रागरंग बदलत गेलेले सगळेच पाहतात.. झारखंड मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी सरकारी अधिकारी बनलेल्या युवतीने लागलीच आपल्याला जग बदलायचे आहे हे स्वप्न उराशी बाळगले आणि लाचखोरीला सुरवात केली.
मिताली शर्मा हे तिचे नाव. १० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तिला रंगेहाथ पकडले. झारखंड लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात १०८ वा क्रमांक मिळवलेल्या मितालीने सहायक निबंधक पदावर आपले नाव कोरले.
झारखंड राज्यातील कोडरमा जिल्ह्यात तिची पहिली पोस्टींग झाली आणि कोडरमा येथील व्यापारी मंडळाच्या सहयोग समितीच्या सदस्याला तिने १० हजारांची लाच मागितली. या सहकारी व्यवसायाची पाहणी केल्यानंतर त्रुटी आढळल्याने तिने स्पष्टीकरण मागितले. स्पष्टीकरणातून मार्ग काढण्यासाठी तिने २० हजारांची मागणी केली. मग सदस्याने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाागाकडे धाव घेतली व तिला हजारीबाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने थेट लाचखोरीतच पकडले.