राजेंद्र झेंडे : महान्युज लाईव्ह
दौंड. : दौंड तहसील कार्यालयासाठी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांना शासकीय कामकाजासाठी वापरण्यात येणारी शासकीय चार चार चाकी गाडी मागील तीन-चार वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. ही गाडी बंद असल्याने तहसीलदारांना सध्या इतर शासकीय गाडी किंवा खासगी भाडेतत्त्वाची गाडीचा वापर करावा लागत असल्याचे चित्र आहे.
शासनाकडून शासकीय अधिकाऱ्यांना कामकाज करण्यासाठी व शासकीय कामानिमित्त ये जा करण्यासाठी शासकीय चारचाकी वाहन दिले जात आहे. मात्र सध्या दौंड तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार कार्यातील चार चाकी वाहनात बिघाड झाल्याने तसेच या वाहनाचा मुदत कालावधी संपल्याने ती गाडी तहसीलदार कार्यालयाच्या आवारात मागील तीन – चार वर्षांपासून धूळखात बंद अवस्थेत पडली आहे.
परिणामी तहसीलदार यांना शासकीय कामकाज करण्यासाठी कोणतंही शासकीय चारचाकी वाहन नाही. त्यामुळे सध्या त्यांना खाजगी वाहनाचा किंवा इतर शासकीय विभागातील वाहनांचा वापर करावा लागत असल्याचे चित्र आहे. शासनाने दिलेली ही गाडी मध्यंतरी तत्कालीन तहसीलदार यांनी दुरुस्ती करून वापरली, मात्र सातत्याने या गाडीमध्ये बिघाड होत असल्याने ती बंद अवस्थेत भंगारात जमा झाली आहे.
त्यामुळे तहसीलदारांना चारचाकी शासकीय वाहन उपलब्ध नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. पुणे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी याबाबत लक्ष घालून दौंड तहसील कार्यालयासाठी स्वतंत्र नवीन शासकीय वाहन उपलब्ध करावे. दरम्यान , याबाबत तहसीलदार अरुण शेलार यांना विचारले असता ते म्हणाले की, नवीन गाडीचा प्रस्ताव आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला आहे. येत्या काही दिवसांमध्ये नवीन वाहन तहसीलदार कार्यालयासाठी येण्याची अपेक्षा आहे. मात्र तोपर्यंत आम्ही इतर शासकीय कार्यालयातील गाडीचा वापर करीत आहे.