सूरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
बातमी पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातील आहे.. गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी राष्ट्रीय हरित लवादाने व मत्स्य व्यवसाय विभागाने बंदी घातलेला मांसाहारी मांगुर मासा बिनधास्तपणे उत्पादित व संवर्धित केला जातो. अनेक वेळा मत्स्य विकास विभागाने या ठिकाणी धाडी टाकल्या. प्रत्येक वेळी त्यांच्या जाळ्यात मांगुर मासा सापडला, ते मासे जप्त केले.. माशाची विल्हेवाट वाट लावली जाते, पण तरीही हा मासा इथं पुन्हा पुन्हा पाळला जातो याचे मागचे इंगित काय?
यामागे कोणता बडा मासा आहे? की ज्याला प्रत्येक वेळी कारवाईतून सूट मिळते? असा प्रश्न आता पर्यावरण प्रेमी विचारत आहेत. काल इंदापूर तालुक्यात पुण्याच्या मत्स्य विभागाने कारवाई केली आणि 1800 किलो मांगुर मासा नष्ट केला. ही गोष्ट कायद्याच्या दृष्टीने बरोबर असली, तरी देखील दरवेळी यातील बडा मासा मात्र ना मत्स्य व्यवसाय विभागाच्या जाळ्यात सापडतो; ना पोलिसांच्या! याची चर्चा या कारवाईनंतर ही सुरू राहिली.
गेल्या काही वर्षांपासून उजनी काठच्या भागांमध्ये मांगुर माशाचे उत्पादन घेतले जात असल्यामुळे उजनीतही मांगुर मासा पोहोचला आणि या मांगुर माशाने उजनीतील पारंपारिक असलेल्या प्रजाती नष्ट करायला खाऊन टाकायला सुरुवात केली. या माशाचे उत्पादन वाढणे ही एकूणच मत्स्य व्यवसाय विभागाला लागणारी मोठी कीड आहे आणि त्याचा मोठा परिणाम मत्स्य विभागावर होत आहे, पण तरी देखील सरकारी मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी जागे होत नाहीत किंवा गेंड्याचे कातडे पांघरून आहेत, अथवा त्यांना याविषयीचे गांभीर्य व देणंघेणं नाही असेच दिसते
मासे विक्री व्यवसाय करणा-या व्यावसायिकांच्या मते एका आयशर टेम्पोत साधारणपणे ५ ते ७ टन मासा असतो. तसेच इंदापूर तालुक्यातील उजनी पाणलोट क्षेत्रात वजनदार व राजकारणाच्या संबंधित बड्या आसामींची माशांची तळी आहेत. यात काहींनी मांगूर माशाचे उत्पादन बिनधास्तपणे सुरू केल्याची माहिती मिळत आहे. पकडण्यात आलेला मांगूर मासाही इंदापूर तालुक्यातीलच असावा अशी चर्चा झडत असताना इंदापूर तालुक्यातील एकही माशांचे उत्पादन करणारा बडा ‘मासा’ पकडला नाही. यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
तालुक्यातील राजवडी गावच्या जवळ एका पाण्याच्या टाकीजवळ माशांच्या वाहतूक करणाऱ्या मोठ्या वाहनातील पाणी काढून दुसरे पाणी टाकून स्वच्छ करुन ती वाहने इतर जिल्ह्यात मार्गस्थ केली जात असल्याचे नागरिक सांगतात. हा क्रम सारखा चालू असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. जर मासा इंदापूर तालुक्यात पाळला जात नाही, तर कारवाई मात्र इंदापूर तालुक्यात का होते? रस्त्यावरची वाहतूक इतर भागात का सापडत नाही? नेमका मांगुर मासा याच भागात कसा पडतो? अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत, मात्र यावर सर्वांचीच आळीमिळी आहे.
एकूणच नेमका कोण मासा सांभाळतो आणि पाळतो हे सगळ्यांनाच माहीत आहे, हा बडा मासा पोलिसांच्या आणि मत्स्य व्यवसायाच्या नजरेत का येत नाही याची सध्या चर्चा सुरू आहे. सरकारी पातळीवरील उदासीनता दिलेले काम नीटनेटके न करण्याची मानसिकता, यातूनच लोकही आपण नाव सांगितले तर आपलेच वाद लागतील म्हणून गप्प बसतात. पण ज्या सरकारचे कर्मचारी सामान्य जनतेच्या कराच्या पैशातून पगार घेतात. त्यांना त्यांच्या स्वतःचं कर्तव्य देखील बजावता येत नसेल, तर असले सरकारी विभाग नेमकं काय कामाचे? असा प्रश्न काल देखील उपस्थित केला गेला.
तोंडदेखली कारवाई करून नेमकं काय होणार आहे? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला असून जे लोक प्रामाणिकपणे सरकारी जातीच्या मास्यांचे संवर्धन करत आहेत, त्यांच्याकडे मात्र दुर्लक्ष आणि जे कायद्याचे उल्लंघन करत आहेत त्यांना मात्र सवलत हे चित्र बरोबर नाही. असेच मत या ठिकाणी उपस्थित केले जात आहे.