महान्यूज आर्टकास्ट
महाराष्ट्रात सध्या सगळीकडे सत्तेत सहभागी झालेली राष्ट्रवादी, पाकिस्तानातून आलेली सीमा हैदर.. दिल्लीत घुसलेले पुराचे पाणी अशाच बातम्यांमध्ये माध्यमे घुटमळली आहेत, मात्र तिकडे महाराष्ट्रातील बायकांनी एक सिनेमा पहिल्यांदाच डोक्यावर घेतलाय.. हो हो.. बायकांनी आपल्या दृष्टीस्वातंत्र्याचे पहिले पाऊल टाकत एक ऐतिहासिक स्थानही पटकावलंय.. खास बायकांनी पाहिलेला.. जीव ओवाळून टाकलेला बाईपण भारी देवा हा चित्रपट थिएटरमध्ये हिंदी, तमिळ.. आणखी कोठल्या कोठल्या भाषेतल्या पिक्चरांना मागे टाकत रेकॉर्ड करतोय.. रडून नाही, बायकांच्या ओसंडून वाहणाऱ्या गर्दीला भिडून पिक्चरला थिएटर मिळताहेत.. महाराष्ट्रातल्या मराठी पिक्चर बनविणाऱ्या केदार शिंदेसकट सगळ्यांच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणाराच हा काळ आहे.
काही दिवसांपूर्वीच भाऊराव कऱ्हाडे या मराठी दिग्दर्शकाने आपल्याला मराठी चित्रपटासाठी थिएटर मिळत नसल्याचे सांगितले.. सगळ्यांपर्यंत आवाज जात नाही, म्हणून रडून सांगितले. मग अजित पवारांपासून सारी मराठी अस्मिता जागी झाली. च्यायला कशी थिएटर मिळत नाही, म्हणून मग मिरवणूका, मोर्चे निघाले.. कोणी ट्रॅक्टर घेऊन मोर्चा काढला, तर कोणी हातात फलक घेऊन..! मग कऱ्हाडेही भारावून गेले. थिएटर मालकांचे अवसान गाळणाऱ्या या घटनेनंतर त्यांना मराठी चित्रपटासाठी थिएटर मिळाले नसते तरच नवल..
काही दिवस थांबून मग त्यांना थिएटरांचा कानोसा घेतला आणि पुन्हा दणदणीत आगमन करण्याच्या वार्ता फिरवल्या. पण टिडीएम हा शब्दच बहुधा मराठी रसिकांच्या डोक्यात शिरला नसावा. तेवढा भेजा अजून गाववाल्यांचा तयार झालेली नाही ना भाऊराव.. त्यांचा दोष नाही.. हो, त्यांचा दोष नव्हताच.. त्याचे कारणही पुढे आणखी आहे.
केदार शिंदे आणि चौकडीने आणखी एक चित्रपट त्यापूर्वीच फेकला होता. एप्रिल २०२३ मध्ये पठ्ठे बापूरावांच्या जीवनावर आधारीत चित्रपट त्यांनी प्रदर्शित केला. त्यातील किसनाचे गाणे लोकप्रिय व हिटही झाले. मात्र प्रत्यक्षात मराठी रसिकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली. प्रबोधनपर चित्रपट चालत नाहीत, मराठी चित्रपट प्रेक्षक अशा चित्रपटांनी प्रोत्साहन देत नाहीत असा रडका सूर केदार शिंदेंनीही त्यावेळी लगावला.
पण याच केदार शिंदेंनी बाईपण भारी देवा हा चित्रपट अवघ्या दोनच महिन्यात याच महाराष्ट्रात प्रदर्शित केला आणि ज्या चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी माध्यमांनी फारसा वेळ दिला नाही, त्या चित्रपटावर या महाराष्ट्रातल्या मायमावल्या अक्षरशः तुटून पडल्या. बायकांनी ओसंडून वाहणारी थिएटरं याच काळात पाहायला मिळाली. एकीने पाहिलेला चित्रपट ती दहा जणींना सांगू लागली.
एरवी नवऱ्याबरोबर, प्रियकराबरोबर, मैत्रिणीबरोबर पाहणारी ती..घरातल्या आई, आजीलाही घेऊन पिक्चर पाहायला आली. आता यावेळी तिला पुरुषांबरोबरच आलं पाहिजे या अटीची काहीच जाण उरली नाही. आसपासच्या, शेजारपाजारच्या, सोसायटीतल्या साऱ्याजणी टायमिंग गाठत बाहेर पडल्या.
पाहता पाहता एकाच आठवड्यात हा चित्रपट सुपरहिट झाला. सैराट सारख्या भेसूर, गंभीर कलाकृती पाहिलेल्या बायका या चित्रपटावर बेहद्द खूष दिसल्या. एक वेळ नाही, अनेकवेळा त्याच चित्रपटासाठी तिकीट काढताना दिसल्या. ही वेळ मराठी रसिकांनी कशी आणली? आता हा प्रश्न केदार शिंदे स्वतःला विचारेल का? जमीनी विकून पिक्चर बनविण्याची कथा सांगणारा भाऊराव कऱ्हाडे हा देखील सांगेल का या यशाचं इंगित?
या यशाचं इंगित एकच आहे, ते म्हणजे तुम्ही किती बजेटचा पिक्चर बनवता, यापेक्षा तो पिक्चर लोकांना स्वतःची कथा वाटणारा, त्या कथेत काहीतरी वास्तवातलं भान पेरलेलं आहे का दाखविणारा असा असेल, तर ती कलाकृती मनापासून स्विकारली जाते, तुमच्या कथेतच दम नाही, तुम्ही साऱ्या कथेचं लोणचं बनवलं असेल, तर त्याला चोखंदळ रसिकही उकीरडाच दाखवणार.. त्याचं वाईट वाटायचं कारण काय?
बाईपण भारी देवा ने सारे रेकॉर्ड तोडायला सुरवात केली आहे. हा पिक्चर बिग बजेट आहे की लो बजेट यात कोणालाच स्वारस्य नाही. हा पिक्चर नेटक्या दमाच्या अभिनयाने समृध्द आहे, तेवढेच महिला प्रेक्षकांना कळाले आणि त्यापेक्षाही या चित्रपटाने हेही दाखवून दिले की, आता महिलांचेही स्वतःचे विचारस्थान आहे. यापुढील काळात फक्त महिलांना समोर ठेवून पिक्चर काढले पाहिजेत..