बारामती : महान्यूज लाईव्ह
सामाजिक कार्यकर्ते राजीव केळकर यांना मॉरिशस येथील जागतिक सांस्कृतिक आणि सामाजिक मंचाकडून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाला आहे. सप्टेंबर महिन्यात मॉरिशस येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय संमेलनामध्ये हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. मॉरिशसचे राष्ट्रपती हे या समारंभाचे प्रमुख पाहूणे असून त्यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात येणार आहे.
राजीव केळकर गेल्या ३० वर्षापासून भोर तालुक्यात ध्रुव प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून काम करीत आहे. त्यांचे काम प्रामुख्याने शिक्षणाच्या क्षेत्रात असले तरी समोर दिसेल त्या समस्येला उत्तर शोधताना त्यांनी आरोग्य, शेती, रोजगार, महिला सबलीकरण, पर्यावरण अशा अनेक क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यापासून त्यांचा प्रवास सुरु झाला. त्यानंतर ग्रंथालय, व्यायामशाळा, कॉम्प्युटर लॅब उभी करणे, महिलांना गोधडी आणि पिशव्या शिवण्याचे प्रशिक्षण, दुधाचा व्यवसाय करण्यासाठी गाईंचे वाटप, शेतकऱ्यांसाठी अवजार पेढी, परिसरातील नागरिकांसाठी रुग्णवाहिका यासारखी अनेक कामे त्यांनी उभी केली.
कोरोनाच्या काळात त्यांनी केलेल्या कामाचे मोठे कौतुक झाले तर पर्यावरणाच्या रक्षणासाठी गावोगावी लोखंडी तिरडी वाटप करण्याच्या त्यांच्या कामाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली. अनेक वर्षे अविरतपणे समाजासाठी कार्यरत असणाऱ्या केळकरांना यापूर्वी अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. आता त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
जागतिक सांस्कृतिक आणि सामाजिक मंचाची स्थापना जगभरातील मराठी माणसांनी केली असून मॉरिशसच्या माजी मंत्री शीलाबाई बापू या मंचाच्या संस्थापक आहेत.