दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
केंजळ ता .वाई येथील बोडरे वस्ती परिसरात दोन अनोळखी तरुणांनी एका पिग्मी एजंटला गाडी आडवी मारुन त्याच्याजवळ असणारी दिड लाख रुपयांची पिशवी भरदिवसा दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घेऊन पोबारा केला होता.
याचा गुन्हा भुईंज पोलिस ठाण्यात दाखल झाला. सहाय्यक निरिक्षक रमेश गर्जे यांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी भुईंज पोलीस ठाण्यातील फौजदार रत्नदीप भंडारे, श्री. उमाप, हवालदार नितीन जाधव, रविराज वर्णेकर,सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते, किरण निंबाळकर यांचे पथक तयार करुन त्यांना आरोपी शोध मोहीमेसाठी रवाना केले.
या पथकाने केंजळ, सुरुर, खंडाळ्यापर्यंत असणारे सीसीटिव्ही चेक करत असताना त्यात दोन आरोपी दुचाकीवरुन जाताना कैद झाले होते. नंबर वरुन हे आरोपी माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी या गावचे रहिवासी असल्याचे पोलिस तपासात निषन्न झाल्याने या पथकाने थेट माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी गाव गाठले.
तेथे साध्या वेशात थांबले. एक दिवस केलेल्या शोध मोहीमेत अजय मोहन पाटोळे (वय २२) व दिपक नाना जाधव (वय ३७, दोघेही रा. धर्मपुरी ता.माळशिरस) हे ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली व पोलिसांना पळवलेली रोख रक्कम आणी इतर कागदपत्रे काढून दिली.