इंदापूर बस स्थानकावरील एटीएम मधील साडेसतरा लाख रुपयांची चोरी करणाऱ्या पंजाबच्या दोन चोरांना अटक..
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर बसस्थानकाच्या व्यापारी संकुलातील इंडिकॅश कंपनीचे एटीएम फोडून १७ लाख ५५ हजारांची रोकड चोरणाऱ्या पंजाबच्या दोघांना (परप्रांतियांना) इंदापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने बेड्या ठोकल्या.
रचपाल बलदेव सिंह (वय ३६ वर्षे, रा. बाबा दिपसिंग नगर, रोड नंबर १, भंटिडा, पंजाब) आणि लखवीर बलदेव सिंह (वय २९ वर्षे, रा. रायखाना, ता. तलवंडी सापो, जि. भंटिंडा, पंजाब) अशी दोघा आरोपींची नावे आहेत. या दोघांना इंदापूर पोलिसांनी त्यांच्या राहत्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. ८ जून रोजीच्या या घटनेतील आरोपींनी चोरी करण्यासाठी खास स्पाय कॅमेरा वापरला होता. पोलिसांनी महिणाभर अथक परिश्रम घेत विविध ठिकाणचे सीसीटिव्ही कॅमेरे तपासल्यानंतर पोलिसांना या चोरांचा ठिकाणा सापडला.
संबंधित कंपनीचे कर्मचारी नितीन पांडुरंग भानवसे (रा. संवदने, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांनी २६ जून रोजी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
आरोपींनी महाराष्ट्रातील सुपे (बारामती), तळेगाव (पुणे), गोवंडी (मुंबई), राजस्थानातील गंगापूर, कोटा, पंजाबमधील पठाणकोट आणि उत्तराखंड राज्यात अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांनी म्हटले आहे.
इंदापूर न्यायालयाने या दोघांनाही ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. चोरट्यांनी न दिसेल अशा ठिकाणी स्पाय कॅमेरा लावला होता, मात्र इंदापूर पोलीसांनी त्याचाही शोध लावत आपले कसब दाखवून दिले. रचपाल सिंह हा आरोपी पुर्वी बँकेत काम करीत होता. त्यामुळे त्याला एटीएम मशीनबाबत पूर्ण माहिती होती.
त्याने संबंधित एटीएम मशीनच्या पैसे भरण्याच्या कॅसेटजवळ न दिसेल अशा ठिकाणी स्पाय कॅमेरा बसवला होता. संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एटीएममध्ये कॅश भरतानाचे रेकॉर्डिंग या कॅमेऱ्यात झाले होते. आरोपींनी याच स्पाय कॅमेऱ्याच्या रेकॉर्डींमधून एटीएमचे पासवर्ड ओळखले. परिणामी काही मिनिटांतच १७ लाख ५५ हजार रु. चोरून दोघे पसार झाले.
सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, सफौ. प्रकाश माने, पो.हवा. ज्ञानेश्वर जाधव, पोलीस नाईक सलमान खान, पोलीस कॉन्स्टेबल नंदू जाधव, गजानन वानोळे, होमगार्ड संग्राम माने यांनी केली असून, या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे करीत आहेत.